पुणे : एलॉन मस्कची टेस्ला भारतात आपला मोटार वाहन व्यवसाय विस्तारण्यासाठी सज्ज झाली आहे. टेस्ला इंडिया मोटर अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडने पुण्यातील पंचशील बिझनेस पार्क येथे कार्यालयासाठी जागा भाड्याने घेतली आहे. कार्यालयाची जागा टेस्लाच्या भारतीय उपकंपनीकडून पाच वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहे.
टेस्ला इंडिया मोटर अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडने पंचशील बिझनेस पार्कमधील बी विंगच्या पहिल्या मजल्यावर ५,५८० चौरस फूट कार्यालयाची जागा घेतली आहे. टेबलस्पेस टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडसोबत हा करार करण्यात आला आहे. पंचशील बिझनेस पार्क सध्या निर्माणाधीन आहे. या पार्कचा एकूण आकार १०,७७,१८१ चौरस फूट आहे. हा पार्क पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे.
टेस्लाने २०१९ साली बंगलोरमध्ये आपल्या भारतीय उपकंपनीची नोंदणी केली होती. या कंपनीचे नाव टेस्ला इंडिया मोटर अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड हे आहे. टेस्लाने भारतात इलेक्ट्रिक वाहने आणि ईव्ही बॅटरी बनवण्यासाठी कारखाना उभारण्याची योजना आखली आहे.