आचार्य-मराठे कॉलेजचा निर्णय

03 Aug 2023 21:38:41
Acharya-Maratha College Students wearing burqa denied entry case

काल सर्वत्र बातमी पसरली होती की, बुरखा घातलेल्या विद्यार्थिनींना मुंबईतील आचार्य-मराठे महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. दै. ‘मुंबई तरूण भारत’ची ‘कृतिशील वाचकांचे कृतिशील दैनिक’ अशी ख्याती. त्यामुळे महाविद्यालय आणि एकंदर तेथील प्रशासनाबद्दल लिहायलाच हवे. लिहिले नाही, तर माझे अंतर्मनही स्वस्थ बसू देणार नाही. गेल्याच आठवड्यात दै. ‘मुंबई तरूण भारत’च्या ‘संवाद आपल्या कन्यांशी’ या विषयाद्वारे ‘लव्ह जिहाद’च्या वस्तुस्थितीबद्दल बोलण्यास आचार्य-मराठे महाविद्यालयामध्ये गेले. त्याआधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.विद्यागौरी लेले यांच्याशी भेट झाली.प्राचार्य म्हणाल्या की, ”आपण बातम्या पाहतो, खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून मुलींचे शोषण केले जाते किंवा त्यांना नशेची लत लावली जाते. त्यामुळे तुम्हाला यासंदर्भात जागृती करण्यासाठी बोलावले.” मी म्हणाले की, ” ‘संवाद आपल्या कन्यांशी’ अंतर्गत ‘माझे शहर लव्ह जिहाद मुक्त शहर’ या विषयावर मी बोलते.” यावर प्राचार्य म्हणाल्या की, ”मुस्लीम समाजाच्या मुलीही आमच्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतात. ‘लव्ह जिहाद’ नावे होणारे व्याख्यान ऐकायला त्या बसतील का? त्यांच्या पालकांना जराही असुरक्षित वाटले, तर कदाचित ते मुलींना शिक्षणाची संधी नाकारतील. असे व्हायला नको. मुलींच्या भवितव्याच्या दृष्टीने खोटे प्रेम, ड्रग्ज यावर विषय मांडा. माझ्या मुलींमध्ये भवितव्याबद्दल जागृती व्हायला हवी.” त्यांचे म्हणणे योग्यच होते. असो. व्याख्यानाच्या दिवशी ८० टक्के बुरखा घातलेल्या मुली होत्या, हे विशेष. बाहेर त्यांचे पालकही उभे होते, हे त्याहूनही विशेष. सावधपणे ते सगळं ऐकत होते. महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मी मनोमन नमस्कार केला. कारण, आपल्या विद्यार्थिंनींची शिक्षणाची संधी कोणत्याही कारणाने हिरावू नये, याबाबतची त्यांची तळमळ खरी होती. साधं एक व्याख्यान आयोजित करतानाही महाविद्यालयाच्या प्रशासनाने इतका दूरगामी विचार केला होता. त्यामुळेच काल-परवा महाविद्यालय आणि बुरखाधारी विद्यार्थिनींमध्ये जे काही घडले असेल, ते विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठीच आणि चांगल्यासाठीच घडले असेल, याबाबत मला अजिबात संशय नाही. अशा या आचार्य-मराठे महाविद्यालयाच्या पाठी सज्जनशक्तीने आणि पालकांनी उभे राहायला हवे!


माकप पक्षाचा निषेध!

गणपतीचे धड मानवाचे आणि डोके हत्तीचे होते. विज्ञानाला प्रोत्साहान देण्याऐवजी अशा भाकडकथा शाळेत शिकवल्या जातात. केंद्र सरकार विज्ञान आणि प्रौद्योगिकीमधील प्रगतीऐवजी मुलांमध्ये हिंदू मिथक शिकवण्यासाठी प्रयत्नशील आहे. सगळयात आधी हिंदू धर्मात पुष्पक विमान बनले, असे हे लोक सांगतात. हे सगळे मिथक आहे,” असे वादग्रस्त विधान नुकतेच एर्नाकुलम येथे केरळ विधानसभा अध्यक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा नेता ए. एन. शमशीरने केले. यावर वाटते की, शमशीर आणि त्याच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मुस्लीम किंवा ख्रिस्ती धर्माबाबत सुद्धा एखादी अशीच टिप्पणी करून दाखवावी. शक्यच नाही. ‘सर तन से जुदा होणार,’ याची त्यांना खात्री आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या, विचारवंतांचा त्यातही रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांची हत्या करण्याचे पातक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित लोक सातत्याने करतात. हिंदू समाज काय कुणीही यावे, टपली मारूनी जावे, इतका सहिष्णू. त्यामुळे हिंदूंच्या देवधर्माबाबत आक्षेपार्ह बरळले, तरी कोण विरोध करणार? अशा गैरसमजुतीमध्ये केरळचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष होता. केरळच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने, तर जाहीर केले की, केरळ विधानसभा अध्यक्ष ए. एन. शमशीर याने गणेश आणि मिथक याबाबत सत्य बोलले. त्यामुळे शमशीर माफी मागणार नाही.मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून अपेक्षा तरी काय म्हणा? मात्र, शमशीरच्या त्या विधानावर केरळमधील हिंदुत्ववादी राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांनी जोरदार आक्षेप घेतला. केरळमध्ये सर्वात प्रभावी आणि सक्रिय असलेल्या नायर समाजानेही शमशीर विरोधात आंदोलन केले. केरळची हिंदू जनता शमशीर विरोधात एकत्र आली. त्यामुळे भविष्यातील सत्तेच्या बेगमीसाठी शमशीर नरमला. मला कुणाच्याही धार्मिक भावनांना ठेच पोहोचवायची नव्हती, अशी सारवासारव त्याने केली. मात्र, आता पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. केरळमधल्या हिंदूंनाही समजले आहे की, भारतीय म्हणून अस्तित्व टिकवायचे असेल, तर देव-धर्म-देशाशिवाय पर्याय नाही. तूर्तास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जाहीर निषेध!

 

Powered By Sangraha 9.0