ठाकरे गटाचा केईएम रुग्णालयाबाहेर मोर्चा!

29 Aug 2023 13:04:23

Thackeray Group


मुंबई :
मुंबईतील केईएम रुग्णालयाबाहेर ठाकरे गटाने आज मोर्चा काढला आहे. केईएम रुग्णालयाच्या कारभाराविरोधात रुग्णालयाबाहेर हा मोर्चा काढण्यात आला आहे. रुग्णालयात अपुऱ्या सुविधा असल्याचा ठाकरे गटाने आरोप केला आहे. परळच्या शाखेपासून ते केईएम रुग्णालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे.
 
अपुरा औषध पुरवठा, नर्स, वॉर्डबॉयची कमतरता याविरोधात हा मोर्चा असल्याचे सांगण्यात येत आहे. या मोर्चात स्थानिक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. आज आमच्या मागण्या मान्य न झाल्यास पुढे अधिक तीव्र आंदोलन करणार असून महापालिकेवर मोर्चा काढणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.
 
दोन बैठकांमध्ये आश्वासन देऊनही काहीच कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. तसेच आम्ही मोर्चा काढणार हे कळल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केईएम रुग्णालयाला भेट दिली असल्याचा दावाही या आंदोलकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, मोर्चामध्ये सरकार आणि महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0