पर्यावरणपूरक गणेशोत्सव-काळाची गरज!

29 Aug 2023 22:27:10
Article On Eco Friendly Ganesh Festival

गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मग यासंदर्भात जागरूक हिंदूंची जबाबदारी नेमकी काय असायला हवी? समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपण व्यक्ती व सामाजिक पातळीवर यानिमित्ताने काही करू शकतो का? आपण यात काही भूमिका बजावू शकतो का? याचा उहापोह करणारा हा लेख...

हिंदू सणांविषयी पर्यावरणाच्या दृष्टीने भाष्य केले की ते भाष्य कोण करत आहे, ही गोष्ट सर्वांत आधी तपासली जाते. अर्थात त्यामागचे कारण देखील महत्त्वाचे आहे. अलीकडच्या काळात डावे पक्ष, संघटना, कलाकार, विचारवंत इ. ’पुरोगामी इकोसिस्टीम’ मध्ये कार्यरत असलेली मंडळी पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली हिंदू सण-उत्सवांवर ऊठसूठ टीकात्मक भाष्य करताना दिसतात. त्यामुळे त्यांचे त्यामागचे हेतू लक्षात घेणे क्रमप्राप्त ठरते. ही मंडळी आपल्या पुरोगामी इकोसिस्टीमचा अजेंडा पुढे रेटून आपले मनसुबे सध्या करण्यासाठी त्यांना पर्यावरणाची काळजी असल्याचा आव आणून हिंदू सण उत्सवांच्या विरोधात भाष्य करतात. अर्थातच, त्यांनी हिंदू समाजाला शहाणपण शिकवण्याची वेळ समाजावर यावी इतका काही हिंदू समाज रसातळाला गेलेला नाही. परंतु, या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले, तर मात्र आपणच आपल्या संस्कृतीच्या र्‍हासास कारणीभूत ठरू.

हिंदू संस्कृतीची मूल्ये आजही समाजमनात रुजलेली दिसून येतात; ही त्यातल्या त्यात आपली जमेची बाजू. त्यामुळे समाजहिताच्या दृष्टीने आवश्यक ते समाजप्रबोधन व्हायचेच असेल, तर ते हिंदू संस्कृतीवर श्रद्धा असलेल्या मंडळींकडून, धार्मिक संस्था, हिंदुत्ववादी संघटनांकडून होणे अपेक्षित आहे, अन्यथा समाजात संभ्रम निर्माण होतो आणि मग धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीने समतोल साधणारी योग्य भूमिका समाजापुढे स्पष्ट होत नाही. भूमिका स्पष्ट न झाल्याने आजूबाजूची बहुसंख्य लोकं जे करत आहेत, त्याचेच उर्वरित समाजाकडून अनुकरण केले जाते. त्यामुळे समाजात अपेक्षित असे परिवर्तन घडवून आणण्यासाठी सर्वप्रथम समाजात जागरूकता निर्माण करावी लागते.

सर्वप्रथम, यंदा प्लास्टर ऑफ पॅरिस मुक्त गणेशोत्सव साजरे व्हायला हवेत, असा संकल्प सर्व जागरूक धर्माभिमानी हिंदूंनी करावा. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती कितीही सुबक असल्या, मनाला आकर्षित करणार्‍या असल्या तरी गणेशोत्सव म्हणजे सुबक मूर्तीचे प्रदर्शन नव्हे; ही गोष्ट समाजमनावर बिंबवण्याची आज आवश्यता दिसून येते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आणणे टाळून आपल्या सनातन संस्कृतीचे, परंपरेचे रक्षण आणि त्याद्वारे समाजात अपेक्षित असे परिवर्तन घडवून आणणे ही जागरूक हिंदूंची जबाबदारी आहे. गणेशोत्सव साजरे करण्याच्या परंपरेत कालानुरूप बदल होत गेले. परंतु, नकारात्मक बदलांचे काय? ही नकारात्मकता आपल्या समाजास किती घतक ठरू शकते? या गोष्टीचा विचार करण्याची वेळ आज हिंदू समजावर आली आहे. होय! आशा सण-उत्सवाच्या निमित्ताने समाजात नव्याने रुजू पाहणार्‍या आणि रुजलेल्या अनिष्ठ परंपरांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याकरिता जागरूक धर्माभिमानी हिंदूंनी पावले उचलण्याची वेळ आली आहे.

गणपती म्हणजे समस्त हिंदूंचे आराध्यदैवत. प्रथम पूजनाचा मानकरी. विघ्नहर्ता असल्याने कुठल्याही शुभकार्याची सुरुवात ज्याच्या पूजनाशिवाय होऊच शकत नाही असे दैवत! एक काळ असा होता की, गणेशचतुर्थीला त्याचे घरोघरी आगमन व्हायचे. भक्तांकडून मोठ्या श्रद्धेने त्याची सेवा होतं असे. आणि म्हणूनच, ’हीच श्रद्धा आपली शक्ती बनली तर? प्रत्येकाने आपापल्या घरी गणपती आणण्यापेक्षा सर्वांचा असा एकच सार्वजनिक गणपती आणला गेला तर... त्याने विखुरलेल्या समाजातील लोकं एकत्र येतील. मिळून मिसळून जीवाभावाने गणेशोत्सव साजरा करतील. ज्याने समाजातील विभिन्न घटक एकमेकांशी जोडले जातील. त्यांच्यात बंधुभाव निर्माण होऊन समाजात एकोपा वाढेल, या विचाराने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. परंतु, हल्ली तो मूळ उद्देश हरवून या उत्सवाचे विकृतीकरण झाल्याचे दिसून येते.

पर्यावरणाची पर्वा न करता प्लास्टर ऑफ पॅरिसचे मोठं-मोठे गणपती आणून, डिजेवर मोठमोठ्याने चित्रपटाची गाणी लावून, रात्र-रात्र पत्ते खेळून, राजकारण्यांना खोटी प्रसिद्धी देऊन, गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत....हे सर्व निंदनीय प्रकार पाहून मनाला बधिरता येते आणि मग, आजच्या पिढीतील हिंदू सणांचे होणारे विकृतीकरण विचार करायला भाग पाडते....हीच आहे का ती आपली महान संस्कृती? अशा प्रकारे सण-उत्सव साजरे करून संस्कृती जपण्याची भाषा करणारी मंडळी कुठल्या प्रकारचा वारसा पुढील पिढीला देऊ इच्छितात? या सर्व गोष्टींमध्ये आपली परंपरा, संस्कृती, एकात्मता, भक्तिभाव, प्रेम-जिव्हाळा या सर्व गोष्टींसाठी कुठेच जागा नसते....इथे जागा असते ती फक्त चढाओढ, मजा-मस्ती आणि थिल्लरपणाला. मूठभर अज्ञानी व अविचारी समाजकंटकांच्या अशा विकृत धोरणांमुळे आपल्या सण-उत्सवाचा कुठला अर्थ आज समाजात पसरत आहे? याची समस्त हिंदू बांधवांनी चिंता करण्याची आवश्यकता आहे.

आपले सण-उत्सव धुमधडाक्यात साजरे झालेच पाहिजे. त्याकरिता आपल्याला कसलीही तमा बाळगण्याची गरज नाही. परंतु, ते आपल्या पारंपरिक पद्धतीने! हा आग्रह मात्र नक्कीच आहे. आपल्या-सण उत्सवांचे विकृतीकरण करून आपण त्यांचे महत्त्व तर कमी करतोच. परंतु, त्यापेक्षाही आपण आपल्या महान संस्कृतीचा अपमान करत असतो. त्यासाठीच सण-उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे करण्याचा आग्रह! पारंपरिक पद्धतीने म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या न आणता, शाडूच्या किंवा इतर प्रकारच्या मातीच्या मूर्त्या आणणे चित्रपटाची गाणी नाही, डॉल्बी स्पीकर नाही, अर्थ समजून उमजून आरत्या, स्तोत्र, भक्तिगीते लावली जावी म्हटली जावी... अर्थ समजून घेऊन तोंडाने आरत्या, स्तोत्रे, भजने, भक्तिगीते म्हटली गेली, तर ‘सोने पे सुहागा’च अति खर्च नाही, विजेची बचत, कृत्रिम रोषणाई करण्यापेक्षा दिवे, पणत्या समयांचा रोषणाईकरिता वापर.

मोठ-मोठ्या वर्गण्या नाही, राजकीय मंडळींचा जयजयकार नाही, मंडळांमध्ये आपापसात स्पर्धा नकोच नको. मंडळांमध्ये एकोपा हवा. प्रत्येक मंडळाने आपली संस्कृती नीट समजून घेऊन, तिच्या रक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे. गणेशोत्सव मंडळ समाजकार्याची केंद्रे व्हायला हवी. समाजातील विविध समस्या समजून घेऊन, आपली सामाजिक बांधिलकी लक्षात घेता, गणेशोत्सव मंडळांनी नको तिथे पैशांची उधळण न करता विविध सामाजिक उपक्रम राबवायला हवे. मंडळामंडळात स्पर्धा करायचीच असेल तर ती...’कुठले मंडळ पर्यावरणाला संकटात न टाकता, समाजहिताचे मोठे कार्य करते? याची असावी.

गणेशोत्सवात हे सर्व बदल लगेचच होणे शक्य नसले, तरीही मूठभर जागरूक हिंदूंनी जरी घडवून आणायचे ठरवले, तर अशक्य नाही. याची सुरुवात आपल्या घरातून होऊ द्या, त्यानंतर आपापल्या परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडे आपला मोर्चा वळवा. या मंडळांशी संपर्क साधून त्यांच्याशी या विषयावर चर्चा करून हा विषय त्यांना नीट समजावून सांगा. समाजाला यासर्व परिवर्तनाची आवश्यकता का आहे? हे त्यांच्या लक्षात आणून द्या. आपल्या सर्वच गोष्टी सर्वांना पटतील असे नाही. परंतु, प्रयत्न करायला काय हरकत आहे? सर्व नाही तरी निदान काही गोष्टी तरी नक्कीच स्वीकारल्या जातील. हे सर्व बदल टप्प्याटप्प्यानेही होऊ शकतात. परंतु, त्याची एकदा सुरुवात होणे महत्त्वाचे आहे. अमुक एक गोष्ट करण्याची आवश्यकता का आहे? हे समाजाला पटवून दिले की, समाज आपल्या हिताचे सर्व काही स्वीकारायला तयार होतो आणि ते पटवून देण्याचे काम आपले आहे.

चला तर मग आपली जबाबदारी लक्षात घेऊन एका नवीन आव्हानाचा स्वीकार करायला सज्ज व्हा. शेवटी परिवर्तन हेच विकासाचे रहस्य आहे. बघा...आपली हिंदू संस्कृती इतकी महान आहे की, तिची जोपासना करण्यातच आपल्या विकासाचे रहस्य दडलेले आहे. आपल्या परंपरा आणि विकास हे परस्परपूरकच आहेत. तेव्हा हिंदू सण-उत्सवात काळाच्या प्रभावाने आलेल्या विकृतीमुळे अप्रत्यक्षपणे हळूहळू होत असलेले हिंदू समाजाचे पतन टाळायचे असेल, तर यापुढे गणेशोत्सव साजरा करताना कुठल्या गोष्टींना प्राधान्य द्यायचे, हे आपल्या लक्षात आलेच असेल.

अ‍ॅड. प्रसाद शिर्के

Powered By Sangraha 9.0