केळवा गावचा सुपुत्र ते मार्गदर्शक

28 Aug 2023 22:14:19
Article On Resort Owner Harishchand Mukund Chaudhary

केळवा गावाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा, यादृष्टीने पहिले पाऊल टाकलेले केळवा गावचे सुपुत्र हरिश्चंद्र मुकुंद चौधरी यांच्या जीवनकर्तृत्वाचा घेतलेला हा मागोवा...

हरिश्चंद मुकुंद चौधरी केळवा गावचे कर्तृत्ववान सुपुत्र. केळव्यातील रिसॉर्ट्स मालकांचे एकत्रीकरण करून त्यांनी ‘केळवे बीच पर्यटन उद्योग विकास संघ’ स्थापन केला. त्यांनी बोरिवली येथे ‘सेतू कोऑपरेटिव्ह के्रडिट सोसायटी’ स्थापन केली. आज सोसायटीचा वार्षिक नफा दीड कोटी असून, १६० कोटी ठेवीची रक्कम आहे. इतकेच काय, बोरिवलीतल्या समाजोन्नती शाळेची स्थापना (आता महाविद्यालय आहे) हरिश्चंद्र यांनीच केली. पण, स्थापन केलेल्या कोणत्याही संस्थेत ते प्रमुखपदावर राहिले नाहीत. संस्था स्थापन केली, ती नावारुपाला आणून स्थिर केली की, त्या संस्थेचे प्रमुखपद सोडून ते सदस्य म्हणून काम करतात. याचे कारण नव्या लोकांना संधी मिळाली पाहिजे. हातपाय चालत नसताना पदं का अडवून बसायची? त्याने संस्थेचे पर्यायाने समाजाचे नुकसान होते, असे हरिश्चंद्र यांचे मत. शिक्षण, व्यवसाय आणि आर्थिक क्षेत्रात उलाढाल असलेल्या संस्था स्थापन करून, त्या संस्था विकसित झाल्या की, संस्थेचे केवळ मार्गदर्शक म्हणून कार्य करणारे हरिश्चंद्र आजघडीला एक आदरणीय व्यक्तिमत्त्वच म्हणायला हवे.

केळवा गावात त्यांचे ‘स्वाद रिसॉर्ट’ आहे. हरिश्चंद यांचा मुलगा प्रचित हासुद्धा कर्तृत्ववान. आपले उत्तम रिसॉर्ट असावे, असे त्याचे स्वप्न. मात्र, ऐन तारुण्यात तो देवाघरी गेला. त्यावेळी सगळ्यातून निवृत्ती घेतलेले हरिश्चंद्र त्यांच्या मुलाने पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा व्यवसायात उतरले आणि केळव्यातील उत्तम रिसॉर्ट म्हणून लौकिक असलेले स्वाद रिसॉर्ट त्यांनी उभे केले. मुलाने वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे, ही जगरहाटी पण ‘स्वाद रिसॉर्ट’ म्हणजे एका बापाने मुलाचे पूर्ण केलेले स्वप्न. उतारवयात, दुःखाचा डोंगर उभा असताना स्वतःला सावरत हरिश्चंद्र यांनी नव्याने केलेली आयुष्याची सुरुवात खरंच प्रेरणादायी आहे. त्यांच्या आयुष्याचा मागोवा घेऊया.

पालघर जिल्ह्यातले केळवा गावात सोमवंशी क्षत्रिय समाजाचे मुकुंद आणि त्यांची पत्नी मनीबाई हे दाम्पत्य. त्यांना नऊ अपत्ये. कष्ट करावे, देवधर्म पाळावा, घरदार सांभाळावे, असे चौधरी कुटुंबाचे साधे आणि निरलस जीवन. प्रामाणिक कष्टाशिवाय पर्याय नाही. हा धडा चौधरी कुटुंबाच्या लेकरांना आपसूकच मिळत होता.हरिश्चंद्र हे चौधरी कुटुंबातले शेंडेफळ. जसं कळू लागले तसे तेसुद्धा बाबांसोबत शेतीच्या कामात हातभार लाऊ लागले. मात्र, मनीबाई लाडक्या लेकाला हरिश्चंद्र यांना म्हणे, ’बाळ तू मातीत हात घालू नकोस, शिक, नाव कमव.’ शिक्षण पूर्ण करावे, यासाठी हरिश्चंद्र दहावीनंतर मुंबईत समाजाच्या वसतिगृहात राहून शिकू लागले.

कलाशाखेत पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्याच काळात त्यांना बँकेत नोकरी लागली. नोकरीनिमित्ताने ते बोरिवलीला राहू लागले. १९७५ साल होते ते. उषा यांच्याशी विवाह झाला. लग्न झाले आणि मधुचंद्रासाठी केळवा पालघरचे हरिश्चंद्र चौधरी पत्नी उषासह गोव्याला गेले. गोव्याचा समुद्र पाहिला आणि त्यांच्या मनात आले अरे आपल्या केळवा गावचा समुद्रही असाच नव्हे, यापेक्षाही सुंदर आहे. आपल्या गावातच हे सगळे असताना आपण गोव्याला का आलो? असा प्रश्न हरिश्चंद्र यांच्या मनात उमटला. आपले गाव पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जावे, यासाठी काहीतरी केले पाहिजे. ही खुणगाठ बांधूनच हरिश्चंद्र गोव्याहून परतले. गोव्याहून परतल्यावर ते परिचयातील सगळ्यांना सांगू लागले की, आपल्या मुंबईपासून जवळ असलेले माझ्या गावचा समुद्र किनारा आणि वातावरण एकदा पाहाल, तर प्रेमात पडाल.

हरिश्चंद्र त्यावेळी मुंबईमध्ये बँकेत कामाला होते. सुट्टीच्या दिवशी किंवा सणासुदीला ते मित्रांना गावी न्यायचे. केळवाचा तो शांत, स्वच्छ आणि सुंदर समुद्र आणि वातावरण पाहून लोक, त्यावेळी चकित व्हायचे. आम्हाला इथे चारदोन दिवस राहायला मिळेल का, विचारायचे. तेव्हा हरिश्चंद्र यांच्या आईने मनीबाईने त्यांना सल्ला दिला की, गावात पर्यटनासाठी येणार्‍यांना वाडीच्या मोकळ्या जागेत खोल्या बांध. तिथूनच ८०च्या दशकात पहिल्यांदा केळव्यामध्ये पर्यटकांसाठी खोल्या बांधण्यात आल्या. त्यावर गावाची संस्कृती बिघडेल, गावात असे कधी पहिले कुणी केले नव्हते, असे म्हणत काही लोकांनी हरिश्चंद्र यांच्या व्यवसायाविरोधात तक्रारी केल्या. हरिश्चंद्र यांच्या खोल्या कोणतीही कल्पना न देता प्रशासनाने तोडल्या. हरिश्चंद्र यांनी नोकरी, घरदार सांभाळत याविरोधात न्यायालयात दाद मागितली. शेवटी निकाल त्यांच्या बाजूने लागला. त्यांनी पुन्हा खोल्या बांधल्या. गावात पर्यटनव्यवस्था निर्माण व्हावी, यासाठी जागृती केली. गावाचा पर्यटन दृष्टीने विकास केला, तर गावकर्‍यांचा आर्थिक फायदाच आहे. यात कोणतेही नुकसान नाही, हे सांगणाारी व्याख्यान भरवली.

८०च्या दशकात सुरू केलेली ही चळवळ आज तिचे फळ म्हणजे केळवा गाव तब्बल ७० रिसॉर्ट्स आज केळव्यात आहेत.त्याचा पाया हरिश्चंद्र चौधरी यांनी घातला, हे न विसरण्यासारखे आहे. केळव्यात पर्यटन व्यवसाय वाढत होता आणि अचानक सर्वच व्यावसायिकांना विक्री कर भरण्याची नोटीस आली, अशावेळी हरिश्चंद्र यांनी ‘केळवे बीच पर्यटन उद्योग विकास संघा’च्या माध्यमातून विक्री कर नवख्या आणि अल्प उत्पन्न असणार्‍या केळव्यातील उद्योजकांसाठी योग्य नाही, हे प्रशासनाला पटवून दिले. शेवटी केळव्यातील उद्योजकांना विक्री कर लागू नाही, ही भूमिका प्रशासनाला घ्यावी लागली. केळवा गाव पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हावे, हे स्वप्न सत्यात उतरवणारे हरिश्चंद्र चौधरी यांचे कर्तृत्व केळवा गावासाठीच नाही, तर आपल्या गावाशिवाचा विकास करू इच्छिणार्‍या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

९५९४९६९६३८

Powered By Sangraha 9.0