पं.नेहरूंची मोठी पोलखोल! डोकलाम युद्धाच्या वेळचं धक्कादायक सत्य उघडकीस...

26 Aug 2023 17:18:30
dr. sudhanshu trivedi on Congress

नवी दिल्ली
: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे त्यांच्या वक्तव्यावरून भाजपच्या निशाण्यावर आहेत. आता भाजपचे प्रवक्ते डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी राहुल गांधींच्या चीनबाबतच्या वक्तव्यावर सडकून टीका केली आहे. सुधांशू यांनी आरोप केला की, जेव्हा चिनी सैन्य उपासमारीने मरत होती, तेव्हा माजी पंतप्रधान नेहरूंनी तांदळाची रसद त्यांना पुरवली होती. त्यावर काँग्रेस काही का बोलत नाही?

डॉ.सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, 'राहुल गांधी यांनी चीनबाबत निराधार विधाने केली आहेत. काँग्रेस सरकारचे चीनशी काय संबंध होते आणि भाजप सरकारचे संबंध कसे आहेत, हे आम्हाला स्पष्ट करायचे आहे. पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यापासून चीन राजनैतिकदृष्ट्या एकाकी पडला आहे.तसेच राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवत सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, 'राहुल गांधींचे चीनवर इतके प्रेम का?, हे राजीव गांधी फाऊंडेशनला मिळालेल्या देणगीमुळे आहे की कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनासोबत झालेल्या कराराचा परिणाम आहे, असा सवाल ही त्रिवेदी यांनी केला.
 
'नेहरूंनी चीनला रसद पुरवली'

पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या काळात चिनी सैन्याला अन्न आणि रसद पुरवल्याचा मोठा आरोप सुधांशू त्रिवेदी यांनी केला. २१ जून १९५२ च्या पत्रकार परिषदेचा हवाला देत सुधांशू म्हणाले की, 'एका पत्रकाराने नेहरूंना चीनला रसद पुरवल्याबाबत प्रश्न विचारला. यावर नेहरू म्हणाले - चीनमध्ये तांदूळ मोठ्या प्रमाणात पाठवला गेला नाही. विशेष बाब असल्याने आम्ही कमी प्रमाणात तांदूळ पाठवला आहे. हा तांदूळ चिनी सैन्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यांना जिवंत ठेवण्यासाठी आम्ही मदत करत आहोत.

सुधांशू त्रिवेदी यांनी आरोप केला की, 'जेव्हा चिनी सैन्य तिबेटमध्ये अत्याचार करत होते, तेव्हा चिनी सैन्य उपासमारीने मरत होते. मग नेहरूंनी तांदळाची रसद पुरवली. साडेतीन हजार टन तांदूळ चीनला देण्यात आला.याआधी चीन लडाखमधील भारतीय भूभाग बळकावत असल्याचा दावा माजी काँग्रेस अध्यक्षांनी केला होता. ते म्हणाले होते- 'लडाख हे मोक्याचे ठिकाण आहे आणि एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की चीनने भारताची जमीन हिसकावून घेतली आहे. विरोधकांच्या बैठकीत पंतप्रधान म्हणाले की, 'लडाखचा एक इंचही भाग चीनने घेतला नाही, हे खोटे आहे.' विशेष म्हणजे , राहुल गांधी सध्या लडाखच्या दौऱ्यावर आहेत.


Powered By Sangraha 9.0