मदुराई रेल्वे दुर्घटनेतील प्रवाशांना संघ स्वयंसेवकांचा आधार

26 Aug 2023 20:21:30
RSS Helps Madurai Railway Accidents

मुंबई (ओंकार मुळ्ये) :
मदुराई येथे एका रेल्वेच्या बोगीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे घडली. या आगीत संपूर्ण बोगी पूर्णतः जळून खाक झाली. लखनौ-कन्याकुमारी असा दक्षिण भारताचा प्रवास करणाऱ्या एका रेल्वेच्या टूरिस्ट बोगीला ही आग लागली असून घटना घडली तेव्हा मदुराई रेल्वे स्थानकातच उभी होती. यात जखमी झालेल्या यात्रेकरूंचे बचावकार्य सकाळपासून युद्धपातळीवर सुरु होते. अपघाताची माहिती मिळताच येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनीसुद्धा या बचावकार्यात तातडीने सहभागी झाले. मृतदेहांना बाहेर काढणे, जखमींना नजीकच्या रुग्णालयात नेणे, त्यांना मानसिक आधार देणे, त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करणे अशा अनेक गोष्टी या स्वयंसेवकांकडून यावेळी करण्यात आल्या.

पहाटे सव्वापाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली तेव्हा बोगीत एकूण ६० ते ६५ यात्रेकरू होते. त्यापैकी एकूण १० भाविकांचा मृत्यू झाला असून २४ जणं गंभीर जखमी झाले आहेत. काही प्रवाशांनी बेकायदेशीरपणे डब्यात गॅस सिलिंडर वाहून नेल्याच्या प्रकारामुळे हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. मदुराई स्थानकावर गाडी उभी असताना बोगीतच स्वयंपाक करण्याचा संतापजनक प्रकार या प्रवाशांकडून करण्यात आला आणि याच हलगर्जीपणामुळे बोगीने अचानक पेट घेतला. अशी माहिती बचावकार्याशी संबंधित एका स्वयंसेवकाने 'दै. मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली.



Powered By Sangraha 9.0