ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश महासत्तेकडे जात आहे. हे अजितदादांना पटलयं . . . हळुहळु शरद पवारांनाही पटेल. असे भाकित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्तवल्याने राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीला दि.२६ ऑगस्ट रोजी ठाण्यातील शक्तीस्थळी मुख्यमंत्री शिंदे यांनी अभिवादन केले. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांच्याबाबतच्या प्रश्नावर त्यांनी सूचक वक्तव्य केले.
दिवंगत आनंद दिघे यांच्या २२ व्या स्मृतीदिनानिमित टेंभीनाक्यावरील आनंद आश्रम व महागिरीतील शक्तीस्थळ येथे सकाळपासुनच शिंदे गटाचा राबता होता. तर आनंद दिघे यांचे पुतणे उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनीही शक्तीस्थळी दर्शन घेतले. यावेळी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीसह हजारो शिवसैनिकांची गर्दी दिघेंच्या समाधीस्थळी जमली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सायंकाळी ४ वा. च्या सुमारास शक्तीस्थळी दाखल झाले.
दिवंगत आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी आदरांजली वाहिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी धर्मवीर दिघे यांची कतृत्वगाथा कथन करून पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर भाष्य केले. शरद पवार यांच्या वक्तव्याबाबत छेडले असता मुख्यमंत्र्यांनी, शरद पवार साहेब हे मोठे नेते आहेत. ते सकाळी काही बोलतात तर दुपारी वेगळेच बोलतात. ते जे बोलतात त्याचा नेमका उलटा अर्थ घ्यायचा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला पुढे नेत आहेत, देशाचा विकास करत आहेत, देश महासत्तेकडे जातोय म्हणुनच अजितदादांनी त्यांना पाठींबा दिलेला आहे.
चंद्रयान-३ यशस्वी झाल्याने एक मोठे पाऊल दिसुन आले. भारत देश महासत्तेकडे जात आहे.हे अजितदादांना पटलयं हळहळु शरद पवारांनाही पटेल. असे भाकित मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. मविआ काळात खासदार नवनीत राणा, केंद्रीय मंत्री नारायण राणे, गिरीश महाजन तसेच अभिनेत्री कंगना रनौत यांच्यावर खोटे आरोप करून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांना अडकविण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. याची देखील मला चांगली माहिती आहे. परंतू सत्तेचा व यंत्रणेचा सर्रासपणे गैरवापर ठाकरे सरकारच्या काळातच झाल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.
फडणवीसांविरोधातही खोटे आरोप ...खोट्या कारवाया - मुख्यमंत्री
"देवेंद्र फडणवीस यांना तुरूंगात डांबण्यासाठी महाविकास आघाडीच्या काळात खोटे आरोप तसेच खोट्या कारवाया करण्यात आल्या. सीबीआयने आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणात फडणवीसांना क्लीनचीट दिली. असे अनेक प्रकार मविआच्या काळात घडल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.मविआ सरकारने त्यावेळी खोटे आरोप करून अनेक बड्या नेत्यांचे राजकीय आयुष्य उद्धवस्त करण्याचा प्लॅन केला. खोटे आरोप करून तुरूंगात डांबण्यांचा कट रचला होता. पण सीबीआयने तपास करून दूध का दूध आणि पाणी का पाणी केले. हे सर्व राज्यातील जनता बघत आहे. तेव्हा येत्या काळात जनताच त्यांना धडा शिकवेल." असं शिंदे म्हणाले.
दिघेंच्या स्मृतीस्थळी दोन्ही गटाचे शक्तीप्रदर्शन
२६ ऑगस्ट रोजी धर्मवीर आनंद दिघे यांची पुण्यतिथी असल्याने शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या नेते व कार्यकर्त्यानी स्मृतीस्थळी शक्तीप्रदर्शन केले. तसेच,राज्य सरकारमधील मंत्री, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे,ठामपा आयुक्त अभिजीत बांगर यांनीही समाधीस्थळी दर्शन घेतले. यावेळी ‘दिघे साहेब अमर रहे’ अशा घोषणा देण्यात आल्या. तर शक्ती स्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे २५ रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आल्या.