मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध जागा रिक्त असल्याचा दावा ‘दि म्युनिसिपल युनियन’ने केला आहे. दि म्युनिसिपल युनियनने म्हटल्याप्रमाणे महापालिकेतील तब्बल ४२ हजारांहून अधिक जागा रिक्त असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेतील सध्या ४२ हजार जागा रिक्त असल्याची माहिती महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मात्र, पालिकेची ही आकडेवारी खोडून काढत ५३ हजार जागा रिक्त असल्याचा दावा ‘दि म्युनिसिपल युनियन’ने केला आहे.
दरम्यान, पालिकेतील मोठ्या प्रमाणात असलेल्या रिक्त जागांमुळे निवडणूक कामांची जबाबदारी पालिका कर्मचाऱ्यांना देऊ नये. त्यासाठी सेवानिवृत्त झालेल्या आणि इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने मुंबई पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेचे कार्य ३४ वॉर्डमधून चालते. तसेच, या करिता ९८ हजारांहून अधिक कर्मचारी पालिकेत कार्यरत आहेत. महापालिकेत १ हजारांहून अधिक लिपिक पदाच्या जागा भरण्यासाठी अंतर्गत कर्मचाऱ्यांची परीक्षा घेण्यात आली आहे. लवकरच या पदांवर कर्मचारी नियुक्त होतील. तर १७०० लिपिक पदाच्या जागा लवकरच बाहेरून भरण्यात येणार असून, त्याची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
मुंबई अग्निशमन दलात ९१० अग्निशमन दलाच्या जवानांची भरती होत असून, त्यापैकी ५००हून अधिक जणांचे प्रशिक्षण सुरू आहे. तसेच, येत्या काही महिन्यांत आणखी जवानांची भरती केली जाणार आहे. तर ४०० हून अधिक अभियंत्यांचीही भरती केली जाणार असून त्या प्रक्रियेसाठी एका खासगी संस्थेची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे.