पक्ष्यांचा धावा ऐकणार कोण ?

25 Aug 2023 19:53:19


state of indian birds


मुंबई (विशेष प्रतिनिधी): एकेकाळी देशात सहज दिसणाऱ्या पक्ष्यांची संख्याही आता सातत्याने कमी होत असल्याने देशातील पक्ष्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याची नितांत गरज आहे, असा निष्कर्ष ‘स्टेट ऑफ इंडियन बर्ड्स २०२३’च्या अहवालात काढण्यात आला आहे. शुक्रवार दि. २५ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात अनेक महत्त्वाच्या समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
स्टेट ऑफ इंडियन बर्ड्स सामान्यपणे SoIB म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या या अहवालामध्ये देशात नियमितपणे आढळणाऱ्या बहुतेक प्रजातींच्या क्षेत्र आणि वर्गवारीप्रमाणे मुल्यांकन केले जाते. २०२३ चा ही अहवाल या निकषांप्रमाणे तसेच संवर्धन स्थितीचे मुल्यांकन करुन तयार करण्यात आला आहे. एसओआयबीचा पहिला अहवाल २०२० मध्ये प्रकाशित करण्यात आला होता. दुसऱ्या अहवालात ३० दशलक्षांहून अधिक पक्षीनिरिक्षणांची नोंद ३० हजारहून अधिक पक्षीअभ्यासकांनी करुन त्याचे मुल्यांकन केले आहे. विशेष म्हणजे सामान्यतः आढळल्या जाणाऱ्या अनेक प्रजातींनाच संवर्धनाची सर्वांत जास्त गरज असल्याचे निदर्शनास येत आहे.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) या प्रमुख संशोधन एनजीओसह या १३ सरकारी आणि विनासरकारी संस्थांच्या गटाने संयुक्तपणे स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्स (SoIB) अहवाल २०२३ तयार केला आहे. अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकोलॉजी अँड द एन्व्हायर्नमेंट (ATREE), फाउंडेशन फॉर इकोलॉजिकल सिक्युरिटी (FES), नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस (NCBS), नेचर कॉन्झर्वेशन फाउंडेशन (NCF), वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (WII), सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथोलॉजी अँड नॅचरल हिस्ट्री (SACON), वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड (WWF), Wetlands International - South Asia (WISA), Center for Ecological Sciences- Indian Institute of Science, Zoological Survey of India (ZSI), National Biodiversity Authority (NBA) आणि वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया (WTI) या संस्थांचा यात समावेश आहे.
काय सांगतो अहवाल?

१) ३० दशलक्ष हून अधिक - निरिक्षणे
२) ३०,००० हून अधिक – पक्षीनिरीक्षक
३) ९४२ पक्षी प्रजातींची – संवर्धन प्राधान्याला वर्गवारी
४) १४ प्रजाती – IUCN कडे पुनर्मूल्यांकनासाठी
५) १७८ प्रजाती - सर्वोच्च संवर्धन प्राधान्य
६) २१७ प्रजाती – स्थिर आणि संख्या वाढणाऱ्या
७) स्मॉल प्रॅटिनकोल, लिटल रिंग्ड प्लोवर, ग्रेट थिक नी, आणि स्मॉल टर्न – ५०-८०% संख्येत घट
८) गवताळ प्रदेशातील ग्रेट इंडियन बस्टर्ड आणि लेसर फ्लॉरिकन यांच्या संख्येत लक्षणीय घट
९) पायाभूत सुविधांचा मोठ्या पक्ष्यांना फटका
१०) उत्खनन, वृक्षतोड यांच्यामुळे मोठ्या प्रमाणावर अधिवासाचा ऱ्हास
“हा अहवाल सिटीझन सायन्सवर आधारित असला तरी, त्यातुन आपल्याला भारतीय पक्ष्यांच्या स्थितीचा आरसा दिसतोय. त्यामुळे वेळ न दवडता आपण एकत्रितपणे कार्य करण्याची गरजेचे आहे.”

 - किशोर रिठे,
अंतरिम संचालक, बाँम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी 
Powered By Sangraha 9.0