मुंबई : अजित पवार हे आमचेचे नेते आहेत. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादीत फूट पडलीच नसल्याचा दावाही शरद पवार यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. पवारांच्या या वक्तव्यानंतर आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यातच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नऊ जण भाजपसोबत ही फुट नाही तर आणखी काय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
विजय वडेट्टीवार म्हणाले, "काँग्रेसनं शरद पवार यांच्या वक्तव्याचा अर्थ काढावा. यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी याचा अर्थ काढावा. शरद पवार बोलत असतील तर याचा अर्थ आम्ही का काढावा? शरद पवार महाविकास आघाडीसोबत आहेत. भाजपनं राजकारण सडवलंय. जनतेचा विश्वासघात या सर्वांनी केलेला आहे. यांची जागा वेळेप्रसंगी जनता दाखवेलच. महाविकास आघाडी म्हणून जे आमच्यासोबत आहेत, ते आमच्यासोबत आहेत."
"शरद पवार मोठे नेते आहेत. त्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय? हे सांगता येणार नाही. उद्या त्यांच्या पक्षाच्या फुटीचं प्रकरण निवडणूक आयोगात जाईल, कोर्टात जाईल. त्यामुळे तो त्यांच्या रणनितीचा भाग असू शकतो. आमच्या पक्षात फूट पडलेली नाही, हे जाहीररीत्या सांगावं. प्रत्येक पक्षाला आपापल्या परीनं तयारी करावी लागते. निवडणुकीमध्ये असे प्रसंग येतात की, शेवटच्या टप्प्यामध्ये आघाडी तुटते. त्यासाठी प्रत्येक पक्षाला रणनिती तयार ठेवावी लागते." असं वडेट्टीवार म्हणाले.