मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यानच्या सहाव्या मार्गिकेला उच्च न्यायालयाची परवानगी

25 Aug 2023 18:03:29
Bombay High Court given permission To The 6th route

मुंबई :
पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यानची मागील आठ वर्षांपासून रखडलेली सहावी मार्गिका आता लवकरच उभारण्यात येणार असून यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने आता हिरवा कंदील दाखवला आहे. मागील आठ वर्षांपासून रखडलेली ही मार्गिका सुरू करण्यात येणारा सर्वात मोठा अडथळा म्हणजे रुळालगतची 'श्रीजी किरण' ही इमारत.

आता या इमारतीचा अर्धा भाग तोडण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली असून इमारतीच्या अर्ध्या भागात राहणारे जमीन मालक सुधीर धारिया व त्यांच्या कुटुंबीयांना तात्पुरते अन्यत्र स्थलांतर होण्यासाठी १५ दिवसांचा अवधी देखील न्यायालयाने दिला आहे. तसेच तोपर्यंत हा अर्धा भाग तोडण्यात येऊ नये असा निर्देश देखील न्यायालयाने दिला आहे.

मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेसाठी सुमारे ३० किमीची मार्गिका उभारण्यात येत असून याकरिता तब्बल ९१८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र या सहाव्या मार्गिकेलगत असणाऱ्या 'श्रीजी किरण' या इमारतीचा काही भाग या मार्गिकेत येत असल्यामुळे २०१५ पासून या प्रकल्पात अडथळा निर्माण झाला. यातील चार प्रकल्पबाधितांना आर्थिक भरपाई देत रेल्वेने यावर तोडगा जरी काढला तरी इमारतीचे मूळ मालक धारिया कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करत भूसंपादनाच्या प्रक्रियेस आव्हान दिल्यामुळे ही मार्गिका आठ वर्षांपासून रखडली होती.




Powered By Sangraha 9.0