हौसेला मोल नसतं...सुनील काळेंच्या प्रयोगशील कलाकृती

25 Aug 2023 20:35:42
Article On Sunil Gajanan Kale Artwork

सुनील गजानन काळे हे छत्रपती संभाजीनगरच्या ठिकाणी नोकरी करणारे गृहस्थ आणि हौशी चित्रकार. त्यांच्या चित्रांना देशविदेशात मागणी असते. एक हौशी दृश्यकलाकार नोकरी सांभाळून इतके मोठे कलाकार्य करतो, ही एक कौतुकाची बाब आहे. छत्रपती संभाजीनगर येथील सोनरी मटळ, दीपावली फेस्टिव्हल, कलाग्राम येथील समूह कलाप्रदर्शन अशा अनेक ठिकाणी त्यांच्या कलाकृतीद्वारे ते सहभाग घेत असतात. त्यांच्या कलाशैलीचा आढावा घेणारा हा लेख...

वेरुळ आणि अजिंठा चित्रशैलीतील लेणी स्थापत्य हे अखिल जगतात सुप्रसिद्ध. अजिंठा चित्रशैलीने तर दृश्यकलाकारांना अनेकदा अनेक विषय दिलेले आहेत. पद्मपाणि बोधीसत्व, बुद्ध जातकं, पिटकं आणि रामायण कथांसह अनेक पौराणिक संदर्भांना चित्रविषय केलेले दिसते. आपण ज्याला ’गेरु’ म्हणतो, मात्र रंगांच्या परिभाषेत त्याच ’गेरु’ला ’इंडियन रेड’ असं म्हटलं जातं. तो ’इंडियन रेड’ अजिंठा चित्रशैलीने कलाजगताला दिला. याच अजिंठा चित्रशैलीवर कथा, कादंबर्‍या, कविता, चित्रपटही प्रदर्शित झाले. अनेक चित्रकार आणि शिल्पकारांना या श्रेणी स्थापत्याने जीवनाचे रंग बहाल केले, अनेकांच्या कलासाधनेतील केंद्रस्थानचा विषय बनले. इतकी चिरंतन असणारी कला अशाच एका चित्रकाराला वेड लावणारी ठरली.

सुनील गजानन काळे हे छत्रपती संभाजीनगरच्या ठिकाणी नोकरी करणारे गृहस्थ. संभाजीनगर- वाळूज औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीत काम करणारे सुनील काळे हे हौशी चित्रकार. हौशेला मोल नसतं. शालेय जीवनापासून सुनील काळे हे चित्र रंगवायचे. निसर्ग सान्निध्यातच त्यांचा जन्म झाला आणि त्याच ठिकाणी त्यांचं शिक्षण झालं. अशा सुनील काळेंना निसर्ग चित्रणाचं वेड लागलं. त्यांनी ’ऑन दी स्पॉट लॅण्डस्केप’ करण्यापर्यंत मजल मारली. सुमारे १०० किलोमीटरवर असलेल्या अजिंठा डोंगरांच्या रांगेत, ज्या सचित्र लेण्या आहेत, त्या पाहण्यासाठीदेखील विद्यार्थी सुनील काळे आठवड्याचा शनिवार-रविवारमध्ये त्या लेण्या पाहायला जायचे. त्या चित्रशैलीचा प्रभाव सुनील यांच्या शैलीवर पडला. त्यांना अजिंठ्याने चित्र विषय दिले आणि सुनील काळे हे हौशी चित्रकार म्हणून ओळखले जाऊ लागले. चित्रकार काळे हे जलरंग अ‍ॅक्रेलिक रंग, ऑईल रंग अशा रंगमाध्यमांमध्ये कलाकृती बनवतात. त्यांनी परिश्रमाने त्यांची रंगलेपन शैली निर्माण केली आहे. त्याच्या चित्रांमध्ये एक निरागसपणा दिसतो.

त्यांच्या चित्रांना देशविदेशात मागणी असते, एक हौशी दृश्यकलाकार नोकरी सांभाळून इतके मोठे कलाकार्य करतो, ही एक कौतुकाची बाब आहे. छत्रपती संभाजीनगर येथील सोनरी मटळ, दीपावली फेस्टिव्हल, कलाग्राम येथील समूह कलाप्रदर्शन अशा अनेक ठिकाणी त्यांच्या कलाकृतीद्वारे ते सहभाग घेत असतात. छ. संभाजीनगरच्या विविध हॉटेल्समध्ये त्यांच्या कलाकृतीअंतर्गत सजावटीत भर घालीत आहेत. त्यांच्या हौशी परंतु कलासक्त जीवनाला मनापासून शुभेच्छा!

प्रा. डॉ. गजानन शेपाळ
८१०८०४०२१३

Powered By Sangraha 9.0