भारताने ’चांद्रयान-३‘ चंद्रावर नेण्याची घटना ऐतिहासिक, अभिमानास्पद अशीच. भारतातील नागरिकांनी या यशाचा मनसोक्त आनंद व्यक्त करून त्याची प्रचितीही दिली. त्यातून भारतीय नागरिकांचे आपल्या देशाविषयी असणारे प्रेमच अधोरेखित झाले. ’चांद्रयान-३‘च्या यशस्वीतेसाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य आणि योगदान देणार्यांप्रती भारतीय नागरिकांनी या यानाचे यशस्वी लॅण्डिंग होताच, तो क्षण ज्या सणासारखा साजरा केला, त्यातून भारतीय नागरिकांचा राष्ट्राभिमान तेवत असल्याचे प्रत्यंतर आले. या एका घटनेने सारा देश एकत्र असल्याचे आश्वासक आणि अपेक्षित चित्र दिसले. विशेष म्हणजे, त्या थेट प्रक्षेपणामुळे आपल्या पुढच्या पिढ्यांनादेखील राष्ट्राभिमानाची अनुभूती घेता आली. लॅण्डिंग होतानाचा क्षण ज्यांनी ज्यांनी अनुभवला, तो आपल्या देशाचा जगभरात डंका गाजविणारा क्षण होता. हे कुणीही नाकबूल करणार नाही. उलट भारताच्या विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील सामर्थ्यावर शंका घेणार्यांना तर या क्षणाने नेस्तनाबूत केले. नाही म्हणायला पुरोगामीत्वाचे गोडवे जपणार्यांनी त्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना कुणीही भाव दिला नाही. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करणार्यांनीदेखील या यशस्वी मोहिमेचे जाहीर कौतुक केले, तेव्हा तर त्यांची बोलतीच बंद झाली. पुण्यात तर सगळ्या विचारांच्या समूहाने हा आनंद साजरा करून भारतीय शास्त्रज्ञांप्रती कृतज्ञता तर व्यक्त केलीच. मात्र, भारत हा विविध विचारांनी नटलेला देश असला, तरी अशा आनंददायी प्रसंगी सगळे मतभेद विसरून आपल्या जिंदादिलीचे दर्शन घडवितो, हे सगळ्या जगाला दाखवून दिले. विशेष म्हणजे, या ’चांद्रयान’ मोहिमेत पुण्यातील बहुतांश शाळांमधील विद्यार्थी, शिक्षकगण तसेच तज्ज्ञांनी एकत्र येऊन अभिमानास्पद कामगिरीवर कौतुक सोहळे साजरे केलेत. पुण्यातील ’वालचंद नगर इंडस्ट्रीज लिमिटेड’ आणि ’व्हीसीबी इलेक्ट्रॉनिक्स’चा या ’चांद्रयान-३‘च्या निर्मिती आणि एकूणच ’इस्रो’ला या कामी हव्या असणार्या तंत्रज्ञानाच्या पुरवठ्यात मोठे योगदान असणेदेखील समस्त पुणेकरांसाठी अभिमानास्पद आहे. यामुळे पुण्याचा गौरव आणखी रेखांकित करण्यास हातभार लागला. जो प्रत्येक पिढीसाठी प्रेरक असेल, यात कुठलाही संदेह नसावा. ’चांद्रयान’ आणि आता आगामी अशाच अवकाश मोहिमांसाठी नव्या पिढीला देखील प्रोत्साहित करणारी ही घटना सर्व भारतीयांचा अभिमान उंचावणारी आहे.
हा आठवडा या भूतलावावरील तमाम भारतीयांसाठी आणि भारतावर नितांत प्रेम करणार्यांसाठी आनंददायी वार्ता घेऊन येणाराच ठरला. ’चांद्रयान-३‘चे यश हे भारताच्या सामर्थ्याला सिद्ध करणारे प्रतीक म्हणून बघत असतानाच, आपण या यशातून भविष्याची वाटचाल पुढील पिढ्यांसाठी अधिक सुकर करणार आहोत. या यशात आधी उल्लेख केला, त्याप्रमाणे पुणेकरांचे जसे योगदान होते, तसेच पुणेकरांचा सन्मान वाढविणारा ’राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारां’तील विजेत्यांमध्ये देखील नाव कोरल्याने हा आनंद अधिक द्विगुणित झाल्याचे म्हणता येईल, प्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णी दिग्दर्शित ’एकदा काय झालं’ या चित्रपटाने ‘सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटा’चा ’राष्ट्रीय पुरस्कार’ जिंकल्याने पुणेकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. ’चांद्रयाना’च्या यशाचा आनंद साजरा करीत असतानाच, ही आणखी एक विजयी वार्ता कानी पडल्याने ऐन उत्सवांच्या दिवसांत पुणेकरांचा हुरूप आता नक्कीच वाढला असणार, असे म्हणायला हरकत नाही. विद्येचे माहेरघर असणार्या पुण्याने जसे विद्वान लोकांची खाण देशसेवेसाठी अर्पित केली, तशीच उत्तम जाणत्या रसिकांचे शहर म्हणून ओळखले जाणार्या, या पुण्यात सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्रातदेखील आपला लौकिक कायम ठेवला आहे. गेल्यावर्षी सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे आणि यंदा सलील कुलकर्णी यांनी ही यशाची कमान अधिक देखणी करीत रसिकांच्या आनंदात भर घातली आहे. हे यश रसिकांना समर्पित असल्याचे संगीतकार सलील कुलकर्णी यांनी सांगितले आहेच. त्यांची कलाकृती केवळ मनोरंजन करणारी नव्हती, तर ’एकदा काय झालं’तून चांगला संदेश देण्याचं काम केले आहे. तसे पाहायले तर तर हे सन्मान, गौरव, पुरस्कार आपल्या कार्यक्षेत्रातील कामाची पावती असले, तरी आपली जबाबदारीदेखील ते वाढवित असतात. आपल्यातील कलागुणांतून इतरांना आनंद देताना केवळ रंजन नव्हे, तर सामाजिक आणि जीवन सुकर, सुसह्य करण्यासाठी दिला जाणार्या मौलिक संदेशामुळे समाज आणि आपलं व्यक्तिमत्त्व अधिक प्रगल्भ आणि परिपक्व होत असतं, पुण्याच्या शिरपेचात असे अनेक पुरस्कार रोवले गेलेत. ’एकदा काय झालं’च्या निमित्ताने हा लौकिक अधिक उजळला, यातून भविष्यात उमलत्या कलाकारांनादेखील प्रेरणा मिळत राहील, अशी अपेक्षा बाळगली तर व्यर्थ ठरणार नाही.