नवेगाव, सिंधुदुर्गात हत्ती प्रकल्प शक्य आहे?

24 Aug 2023 21:27:14


हत्ती


मुंबई (विशेष प्रतिनिधी): राज्यातील वाढत्या वन्य हत्तींची संख्येवर उपाय म्हणुन नवेगाव आणि सिंधुदुर्गात हत्ती प्रकल्प करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. वन्य हत्तींमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान तसेच स्थानिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी गडचिरोली-गोंदिया भागात नवेगाव तर, कोकणात सिंधुदुर्गमध्ये हत्ती प्रकल्प करण्यासाठी वनविभागाने प्रयत्न सुरू केले आहेत.
देशात ३३ तर, राज्यात ६ हत्ती प्रकल्प सध्या आहेत. वन क्षेत्रातुन काही हत्ती खाद्याच्या शोधात अनेकदा शेतीमध्ये किंवा वस्तीच्या ही ठिकाणी आलेले पहायला मिळतात. त्यामुळे अनेक शेतीपिकांचे नुकसान होते. शेतीमालाच्या संरक्षणासाठी तसेच हत्तींची संख्या आणि अधिवास संवर्धन व्हावे या दृष्टीकोनातुन हत्ती प्रकल्प राबविला जाणार असला तरी नवेगावात हा प्रकल्प राबविणे शक्य आहे.
सिंधुदुर्गमध्ये मात्र, मोठ्या प्रमाणावर खाजगी क्षेत्र असल्यामुळे हा प्रकल्प आणणे कठिण होणार आहे. सिंधुदुर्गमध्ये सध्या ५ हत्ती (१ नर, १ मादी आणि ३ पिल्ले) वास्तव्यास आहेत. मुबलक प्रमाणात खाद्य उपलब्ध नसेल तर हत्ती खाद्याच्या शोधात इतरत्र फिरू लागतात. यामध्ये अनेक वर्षांची शेतीपिके आंबा, फणस, पोफळीच्या बागांचे नुकसान वन्य हत्ती करतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानाचा ही सामना करावा लागतो. खाजगी क्षेत्र असल्याने सिंधुदुर्गात प्रकल्प करणे शक्य नसले तरी या हत्तींचे स्थांनातरण करणे हाच योग्य पर्याय असल्याचे स्थानिक सांगतात.
“मोठ्या प्रमाणावर असलेल्या खाजगी क्षेत्रामुळे हा प्रकल्प इथे होऊ नये असंच वाटतं. मुळातच कमी क्षेत्र त्यातही ते प्रकल्पात गेलं तर शेतकरी करणार काय असाही प्रश्न आहेच. त्यामुळे सिंधुदुर्गात हत्ती प्रकल्प होऊ नये असं अनेक स्थानिकांचं ही म्हणणं आहे.”
- संजय सावंत,
पर्यावरण अभ्यासक
वनश्री फाउंडेशन, सिंधुदुर्ग 
Powered By Sangraha 9.0