अभिनेते गिरीश ओक यांना पितृशोक

    24-Aug-2023
Total Views |

girish oak



मुंबई :
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांच्या वडिलांचे निधन झाले असून ते ९३ वर्षांचे होते. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाल्याची बातमी गिरीश ओक यांनी स्वत: पोस्ट शेअर करत दिली आहे.गिरीश ओक यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत “काल माझे बाबा रत्नाकर दिनकर ओक यांचं वयाच्या ९३ व्या वर्षी वृध्दत्वामुळे निधन झालं. प्रत्येक मुलाचे/मुलीचे वडील हे त्याचे पहिले हिरो असतात तसेच तेही माझे होतेच”, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
 
काय लिहिले आहे गिरीश ओक यांनी त्यांच्या पोस्टमध्ये?
 
माझ्यात ज्या काही थोड्याफार तथाकथित बऱ्या सवयी गोष्टी आहेत त्या त्यांच्यामुळेच. ते इलेक्ट्रिकल इंजिनिअर होते आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात चीफ इंजिनिअर या पदावरून ते १९८९ साली निवृत्त झाले. त्यांनी त्यांच्या हयातीत कधीही भ्रष्टाचार केला नाही.
या व्यतिरिक्त त्यांना अनेक गोष्टी अवगत होत्या. त्यांना संस्कृत फ्रेंच जर्मन स्पॅनिश, गुजराती, उर्दू इतक्या भाषा यायच्या ते शिवणकाम आणि स्वयंपाक उत्तम करायचे. कपड्यांना इस्त्री, सायकल, स्कूट,र घड्याळं घरातल्या जवळ जवळ सगळ्याच उपयोगाच्या वस्तूंचं सर्विसींग दुरूस्ती तेच करायचे. तेव्हा मी त्यांना असिस्ट करायचो त्यामुळे त्या गोष्टी मीही शिकलो.
माझी आई गंमतीनी म्हणायची, “मी आणि बहीण यांना नटबोल्ट नाहीत नाहीतर त्यांनी आम्हालाही उघडून आमचं सर्विसींग केलं असतं. अर्थात ते त्यांनी न उघडताच केलं. ते बासरी आणि माउथ ॲार्गन छान वाजवायचे ते त्यांनी मला शिकवायचा प्रयत्नही केला पण मीच कंटाळा केला.रोज नियमीत सूर्यनमस्कार आणि प्राणायाम करणं मी त्यांच्यामुळेच शिकलो.
 
अन्नाची, पाण्याची, विजेची नासाडी त्यांना अजिबात खपत नसे या गोष्टींची किंमत मला त्यांच्यामुळेच कळली.काय काय आणि किती सांगू.आखीर बाप बाप होता है और बेटा बेटा.
 

girish oak post 
 
बाबा तूम्ही खूप सकारात्मक व्यासंगी आनंदी आयुष्य जगलात. तुम्ही खूप शांत संयमी होतात आणि अगदी तसेच जातानाही तुम्ही आम्हाला कोणालाही त्रास न देता शांतपणे गेलात.मला आणि सौ. पल्लवीला शेवटी तुमची सेवा करता आली हे आम्ही आमचं भाग्य समजतो. तुम्हाला सतत वेगवेगळ्या कामात व्यस्त असणं आवडायचं देव तुम्हाला तसंच व्यस्त ठेवो म्हणजे तुम्ही आनंदी राहाल.”