मुंबई : चांद्रयान-३ च्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगचा आनंद संपूर्ण भारत साजरा करत आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही चांद्रयान-३ च्या यशानंतर इस्रोचे अभिनंदन केले, परंतु त्यांच्या एका चुकीमुळे त्या चांगल्याच ट्रोल झाल्या आहेत.
ममता बॅनर्जी यांनी एका कार्यक्रमात इस्रोचे अभिनंदन केले. १९८४ च्या मिशनची कथा सांगताना त्यांनी अंतराळवीर राकेश शर्माऐवजी चित्रपट निर्माते राकेश रोशन यांना श्रेय दिले. ममता बॅनर्जी म्हणाल्या, "पश्चिम बंगालच्या लोकांच्या वतीने मी इस्रोचे अभिनंदन करते. याचे श्रेय शास्त्रज्ञांना मिळाले पाहिजे. १९८४ साली इंदिरा गांधींनी भारतातील एका व्यक्तीला चंद्रावर मोहिमेसाठी पाठवले होते. ती व्यक्ती म्हणजे राकेश रोशन. ते जेव्हा चंद्रावर पोहोचले तेव्हा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना विचारले की तिथून भारत कसा दिसतो? त्यावर ते म्हणाले सारे जहाँ से अच्छा हिंदुस्ता हमारा..."
त्यांचा हा व्हीडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरी त्यांच्या अज्ञानाची खिल्ली उडवत आहेत. तर काही नेटकऱ्यांनी मजेशीर मीम्स बनवले आहेत. ममता बनर्जी सोबतच राजस्थानमध्ये काँग्रेसपक्षाचे मंत्री सुद्धा चांद्रयानात गेलेल्या प्रवाशांना शुभेच्छा देऊन ट्रोल झाले. वास्तविक पाहता चांद्रयानमध्ये अंतराळवीर गेलेला नाही. पण मंत्री महोदयांना ही गोष्ट माहित नव्हती.