सडे संवर्धनात स्थानिकांची भूमिका महत्त्वाची;

23 Aug 2023 14:36:21
sada workshop


मुंबई :
कोकणातील कातळ सडे संवर्धनात स्थानिकांची भूमिका महत्त्वाची असल्याचा ऊहापोह रत्नागिरीत पार पडलेल्या ‘सडा: शोध आणि बोध’ या कार्यशाळेतून करण्यात आला. ‘बॉम्बे एनव्हार्यनमेंटल ऍक्शन ग्रुप’ आणि ‘द हॅबिटॅट्स ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सडा: शोध आणि बोध’ कार्यशाळा दि. १९ आणि २० ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला कोकणातील स्थानिक मंडळीसह, संशोधक, पुणे-मुंबईतील विद्यार्थी आणि माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.


कोकणातील किनारपट्टी भागातील सड्यांवर आधारित दोन दिवसीय रहिवासी कार्यशाळा रत्नागिरीतील श्री कनकादित्य मंदिर भक्तनिवास, कशेळी येथे ठेवण्यात आली होती. या कार्यशाळेत सड्यांवरील माहिती पुस्तिका आणि मार्गदर्शिका यांचे अनावरण सह्याद्री निसर्ग मित्रचे संस्थापक भाऊ काटदरे, बॉम्बे एनव्हार्यनमेंटल ऍक्शन ग्रुपच्या हेमा रमाणी आणि नवरोज मोदी, डॉ. अपर्णा वाटवे, कशेळी गावच्या सरपंच सोनाली मेस्त्री आणि सिंधुदुर्गचे मानद वन्यजीव रक्षक नागेश दप्तरदार यांनी केले.


aparna watve


‘द हॅबिटॅट्स ट्रस्ट’च्या अनुदानातून कोकणातील सडा अधिवासाच्या जैविक आणि सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनासाठीचे काम चालू आहे. या अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पामध्ये शास्त्रज्ञांनी स्थानिक जाणकार, ग्रामपंचायती आणि स्थानिक निसर्गप्रेमी यांच्या मदतीने रत्नागिरीतील सड्यांवरील जैवविविधता तसेच सांस्कृतिक माहिती आणि समाजजीवन यांची नोंद केली आहे. त्यांचे संवर्धन करण्याच्या आणि माहितीची देवाण घेवाण करण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. शनिवार दि. १९ ऑगस्ट या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी विविध तज्ञ संशोधकांनी उपस्थितांनी सडे या विषयावर मार्गदर्शन केले. परिसरातील सड्यांवर दिर्घकालीन संशोधन करणाऱ्या डॉ. अपर्णा वाटवे यांनी परिसराबद्दल, त्यातील जैवविविधतेबद्द्ल आणि सड्यांवर होणाऱ्या वातावरणीय बदलांबद्दल मार्गदर्शन केले. सड्यांना वेस्टलँड ऍटलासवरच स्थान दिलेले पहायला मिळते अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कशेळीच्या सरपंच सोनाली मेस्त्री यांनी आपल्या सादरीकरणामध्ये स्थानिक लोकांचे सड्याशी असलेले नाते सांगितले. तसेच, ग्रामीण जनजीवन कोणत्या प्रकारे अवलंबुन आहे आणि सड्याशी असलेले सहसंबंध ही उपस्थीतांना समजावुन सांगितले. रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे भूगोल विभागप्रमुख डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई यांनी सड्यांची निर्मिती कशी होते याबाबतची सर्व भूगर्भशास्त्रीय पद्धत उपस्थीतांना समजावुन सांगितली.

डॉ. अपर्णा वाटवे यांच्याबरोबर या प्रकल्पात संशोधन करणाऱ्या मनाली राणे, पुजा घाटे, जिथिन विजयन आणि आदित्य गडकरी या संशोधकांनीही आपले काम आणि संशोधनादरम्याण आलेले अनुभव याबद्दल उपस्थितांशी संवाद साधला. संशोधन करताना वापरलेली कार्यपद्धत याबद्द्ल त्यांनी सांगितले.


akshay mandavkar



राजापुर तालुक्यातील अणसुरे गावात लोकजैवविविधता नोंदवहीचा पहिला यशस्वी प्रयोग करणाऱ्या हर्षद तुळपुळे यांनीही यावेळी जैवविविधता आणि त्याच्या नोंदींचे महत्त्व सांगत प्रकल्पाबद्दल सांगितले. स्थानिक पर्यावरण अभ्यासक प्रतिक मोरे यांनी त्यांच्या सेव्ह कोकण मुव्हमेंट तसेच संकल्प सह्याद्री याबाबत माहिती दिली. ‘बॉम्बे एनव्हार्यनमेंटल ऍक्शन ग्रुप’च्या हेमा रमाणी यांनी ‘बीइएजी’च्या याआधीच्या सड्यांवरील कामाचा आढावा देत त्याचे कायद्याच्या दृष्टीकोनातुन मार्गदर्शन केले. दै. मुंबई तरुण भारतचे वरिष्ठ पर्यावरण प्रतिनिधी अक्षय मांडवकर यांनी कोकण दिपकाडी या वनस्पतीवर 'महाएमटीबी'ने तयार केलेली ‘कोकणची राणी: कोकण दिपकाडी’ ही चित्रफित सादर केली. पुर्वा जोशी यांनी या कार्यक्रमाची सुत्रे सांभाळली.


कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी रत्नागिरीतील देवी हसोळ या सड्याला भेट देऊन संशोधकांनी तेथील जैवविविधता तसेच कातळशिल्पे याबद्दल मार्गदर्शन केले. सड्याबद्दल आणि तेथील जैवविविधतेबद्दल फारसे माहिती नव्हते त्याचे महत्त्व माहीत झाले अशा उत्स्फुर्त प्रतिक्रिया कार्यशाळेच्या अंतिम टप्प्यात सहभागकर्त्यांकडुन येत होत्या.




Dr. Aparna Watve






Hema ramani







Powered By Sangraha 9.0