कोरेगाव भीमा प्रकरण : ज्योती जगतापच्या जामीनाची सुनावणी पुढे ढकलली

22 Aug 2023 19:31:39
Supreme Court Hearing On Koregaon Bhima Case

नवी दिल्ली :
कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी ज्योती जगताप हिच्या जामीन याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने २१ सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलली आहे. ज्या फॉर्म्युलाच्या आधारे प्रकरणातील सह-आरोप वर्नोन गोंसाल्वेस आणि अरुण फरेरा यांच्या जामीन याचिकेवर निर्णय घेण्यात आला,त्यात जगताप यांची याचिका बसते की नाही यासंबंधी विचार केला जाईल,असे तोंडी मत खंडपीठाने मंगळवारी नोंदवले आहे.

न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्या. संजय कुमार यांचे खंडपीठ जगताप यांची जामीन याचिका फेटाळण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेत आहेत. यावेळी खंडपीठाने राष्ट्रीय तपास संस्था तसेच महाराष्ट्र सरकारला तीन आठवड्यांच्या आत उत्तरार्थ प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे देखील निर्देश दिले आहेत.१४ सप्टेंबरपर्यंत एनआयएला अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास खंडपीठाने सांगितले आहे.

कोरेगाव - भीमा येथे २०१८ मध्ये झालेला हिंसाचार तसेच नक्षलवाद्यांसोबत कथितरित्या संबंध असल्याच्या आरोपखाली जगताप २०२० पासून तुरूंगात आहे.गोंसाल्वेस आणि फरेरा यांच्या जामीन याचिकेवरील निर्णय लवकरच येणार असल्याचे सांगून न्या.बोस यांच्या खंडपीठाने यापूर्वी जुलै महिन्यात जगताप यांच्या जामीन याचिकेवरील सुनावणी स्थगित केली होती. दरम्यान, न्यायालयाने पाच वर्षानंतर गोंसाल्वेस आणि फरेरा यांना जामीन दिला होता.





Powered By Sangraha 9.0