मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट देण्यात येत असल्याची घोषणा जपानमधील "कोयासन विद्यापीठा"ने आज केली आहे. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा तसेच औद्योगिक विकास, जलयुक्त शिवार सारख्या योजनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले प्रयत्न इत्यादी उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना ही मानद डॉक्टरेट जाहीर करण्यात आली आहे.
आज कोयासन विद्यापीठाचे डीन श्री. सोएदा सॅन यांनी ही घोषणा केली. आगामी भारत भेटीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही उपाधी प्रदान करण्यात येईल. जपान सरकारने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘शासकीय अतिथी’ हा विशेष दर्जा देऊन आमंत्रित केले आहे. ते २० ऑगस्टपासून जपान दौऱ्यावर जात आहेत. यापूर्वी २०१३ साली गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर राज्य पातळीवरील एखाद्या नेत्याला हा मान मिळण्याची ही पहिलीच घटना आहे.