दुसरीत शिकणाऱ्या ४ मुलींवर मुंबईतील मनपा शाळेत अत्याचार!

22 Aug 2023 17:02:48
 
Chitra Vagh
 
 
मुंबई : विक्रोळीच्या टागोरनगर परिसरातील मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या ४ मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पीटी शिक्षकाला विक्रोळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. सौरव उचाटे असे ताब्यात घेण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
 
आरोपी मुलींना घाबरवण्याच्या नावाखाली त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, अशी माहिती काही विद्यार्थीनींनी त्यांच्या पालकांना दिली. संतापलेल्या पालकांनी शाळेत जाऊन शिक्षकाला चोप दिला. यानंतर आरोपीला पोलिसांच्या हवाली केले. आरोपीला पोलीस ठाण्यात हजर केल्यानंतर पोलिसांनी पालकांना घरी जाण्याची विनंती केली. यावर पोलिसांना या घटनेचे गांभीर्य समजत नाहीये. पोलीस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
 
या प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. घडलेला प्रकार अतिशय धक्कदायक असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. आरोपी शिक्षकाविरोधात कठोर कारवाई केली जाणार. आरोपीची कुठलीही माहिती न घेता त्याची नियुक्ती करण्यात आली, त्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. तसेच भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी पालिका प्रशासनाला योग्य ती खबरदारी घेण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. असं चित्रा वाघ म्हणाल्या.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0