विणकरांची शैली आणि भरवशाच्या रंगांमुळे साडीला विशेष महत्त्व
21-Aug-2023
Total Views | 77
तेलंगणा : जशी महाराष्ट्रातील पैठणी साडी प्रसिध्द आहे, तशीच तेलंगणातील पोचमपल्ली साडीदेखील जगप्रसिध्द आहे. पोचमपल्ली साडी ही तेथील स्त्रियांचा मुख्य पोशाख असून या साड्या तेथील विशिष्ट इकत शैलीत तयार केल्या जातात.
तेलंगणा राज्यातील पोचमपल्ली या गावात ही साडी बनवली जाते. त्यामुळेच या गावाच्या नावाने ही साडी ओळखली जाते. हे गाव आपल्या विणकामाच्या शैलीसाठी प्रसिध्द आहे. येथे विशिष्ट इकत शैलीमध्ये साड्या तयार केल्या जातात. त्यामुळेच याला सिल्क सिटी असेदेखील म्हटले जाते.
पोचमपल्ली हा गाव हैदराबादपासून ४० किमी अंतरावर आहे. इथल्या साड्या देशभरात पाठवल्या जातात. या सा़ड्यांची देशात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. ही एक साडी तयार करण्यासाठी जवळपास ४० दिवस लागतात. श्रीलंका, मलेशिया, दुबई, युरोप आणि फ्रान्ससह अनेक देशांमध्ये या साड्यांना मोठी मागणी आहे.
पोचमपल्ली साडी ही तिची बनवण्याची शैली आणि विशिष्ट डिझाइनसाठी प्रसिध्द आहे. या साड्यांवर रंगीबेरंगी धाग्यांच्या सहाय्याने डोंगराचे आकार तयार केले जातात. याच पध्दतीला पोचमपल्ली इकत असे म्हणतात. तसेच या साड्या विशिष्ट कपड्यासाठीही प्रसिध्द आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेने पोचमपल्ली या गावाची पर्यटनाच्या दृष्टीने देशातील सर्वोत्तम गाव म्हणून निवड केली आहे. जी गावे आपला वारसा सांभाळत संस्कृतीला चालना देतात, अशा गावांना ही संघटना सर्वोत्कृष्ट पर्यटन गावाचा दर्जा देते. पोचमपल्ली साडय़ा अठराव्या शतकापासून प्रसिद्ध असून पूर्ण सुती, पूर्ण रेशमी आणि सुती अधिक रेशमी मिश्र अशा तिन्ही स्वरूपांत विणल्या जातात. साडी तयार करण्याची विणकरांची शैली आणि त्यासाठी वापरण्यात येणारे भरवशाचे रंग यामुळे साडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.