निस्तेज बुद्धीचे ‘प्रताप’

21 Aug 2023 21:30:34
Patna's Atal Bihari Vajpayee Park renamed Coconut Park

बिहारची राजधानी पाटणा येथील कंकरबाग येथे असलेल्या अटलबिहारी वाजपेयी पार्कचे आता ’कोकोनट पार्क’ असे नामकरण करण्यात आले. बिहारचे पर्यावरणमंत्री तेजप्रताप यादव यांच्या हस्ते या पार्कचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, या उद्यानाला पुन्हा अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे आणि त्यात छेडछाड न करण्याची मागणी बिहार भाजपने केली आहे. माजी पंतप्रधान वाजपेयींचे निधन झाल्यानंतर या पार्कला त्यांचे नाव देण्यात आले होते. २००४ साली बिहारमधील एका रॅलीत वाजपेयींनी आपण ’अटल’ तसेच ’बिहारी’ असल्याचे म्हटले होते. या त्यांच्या वक्तव्यावरून त्यांना बिहारविषयी असलेले प्रेम दिसून येते. आणीबाणीच्या काळात ते पूर्व चंपारणला आले असता, त्यांना अटकदेखील झाली होती. या उद्यानात कंकरबागच्या लोकांनी अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळाही बसवला होता. मात्र, आता या पार्कचे नाव बदलण्याचा नतद्रष्टपणा बिहारच्या नितीश सरकारने केला आहे. केंद्रात विरोधी पक्षात असतानाही नितीश कुमार यांनी अनेकदा अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. वाजपेयींचे ते नेहमी कौतुक करत असत. पुढे त्यांची भाजपसोबत युतीदेखील केली होती. परंतु, सत्तेच्या लालसेपोटी नितीशबाबूंनी जंगलराजचा रस्ता पकडला. तेजप्रताप यादव यांचे दिव्य ज्ञान तर अख्ख्या बिहारला ज्ञात आहे. मंत्रिमहोदयांना साधे भाषण करायलाही जड जाते. विषय सोडून भरकटणे हे तर त्यांना चपखल जमते. त्यामुळे त्यांच्याकडून तशाही फार काही अपेक्षा नाही. परंतु, स्वतःला ‘सुशासन बाबू’ म्हणवून घेणारे नितीशदेखील आता ‘जंगलराज’च्या अधीन होतील, अशी अपेक्षा नव्हती. जे नितीश अटलजींना बर्‍याचदा ‘पूज्य अटलजी’ म्हणत, आज तेच मुख्यमंत्री असताना अटजींच्या नावाऐवजी पार्कला ‘कोकोनट पार्क’ नाव देण्यात आले, तेही एका बालहट्टी पर्यावरण मंत्र्यामुळे. तसे पाहिल्यास महाराष्ट्राचे बरेच नुकसान बालहट्टामुळे झाल्याचे आपण पाहिले आहेच. परंतु, आता तेच बिहारची जनता सोसत आहे. बरं नाव बदललंच आहे, तर जरा दुसरं काही तरी चांगलं नाव ठेवलं जाईल, असं वाटलं होतं. परंतु, नाव ठेवलं ‘कोकोनट पार्क.’ अशी फालतू नावं देण्यापेक्षा अटलजींचे नाव कधीही त्या पार्कला शोभले असते. एकूणच नितीश यांचा नतद्रष्टपणा आणि निस्तेज बुद्धीच असे सूडभावनेचे कृत्य करू शकते.

‘प्रकाशा’कडून अंधाराकडे...

बुधवार, दि. २३ ऑगस्ट रोजी भारताचे ‘चांद्रयान’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यास सज्ज झाले असून, देशभरातून ही मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रार्थनांचा ओघ सुरू झाला आहे. मात्र, काही लोकांच्या डोक्यात प्रकाश अजूनही पडलेला नाही. कोणत्या विषयात राजकारण करायचे आणि कोणत्या विषयाची खिल्ली उडवायची याचे साधे जुजबी ज्ञानदेखील अशा लोकांना प्राप्त करता येत नाही, हे त्यांचे दुर्दैवच. त्यापैकीच अशी एक व्यक्ती म्हणजे दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज. ‘नावात काय असतं’ या वाक्याला या व्यक्तीने सपशेल खोटे ठरवले. नाव ‘प्रकाश’ असले तरीही मात्र विचारांचा प्रचंड अंधार आणि अंधारच दिसून येतो. प्रकाश राज याने नुकतेच एक फोटो ट्विट करत भारताच्या ‘चांद्रयान-३’ मोहिमेची खिल्ली उडवली. त्याचबरोबर अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीदेखील फिरकी घेतली. या फोटोमध्ये ‘इस्रो’चे माजी संचालक के. सिवन यांचं एक कार्टुन असून ते एका कपातून दुसर्‍या कपात चहा ओतत असल्याचं दिसते. हा फोटो शेअर करतानाच त्यांनी ब्रेकिंग न्यूज; विक्रम लॅण्डरकडून चंद्रावरील पहिला फोटो येत आहे. वॉव... असं म्हणत ’र्क्षीीींरीज्ञळपस’ हा हॅशटॅगही वापरला आहे. प्रकाश राजच्या या खोडसाळपणामुळे आता तो ट्रोल झाला आहे. राजकारण आणि सत्ताधार्‍यांवर जर टीका करायची असेल तर बाकी अनेक मुद्दे आहेत. परंतु, यात ‘इस्रो’ला ओढून त्यावर टिंगलटवाळ्या का कुणीकडचा पुरोगामीपणा? कमी पैसा, तुटपुंजी संसाधने असतानाही जे भल्या भल्या देशांना जमले नाही ते भारताने करून दाखवले. अंतराळ मोहिमेचे जनक विक्रम साराभाई यांचे नाव सध्याच्या ‘चांद्रयान’ मोहिमेतील विक्रम लॅण्डरला देण्यात आले आहे. देशाची मान अभिमानाने उंचावली जात असताना प्रकाश राजसारख्या माणसाला खिल्ली उडवण्याची हौस भागवायची आहे. याआधीही त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यापेक्षा मोठे अ‍ॅक्टर आहेत, अशी टीका केली होती. त्याआधी त्याने पंतप्रधान मोदींना चहावाला म्हणून हिणवले होते. विशेष म्हणजे, ‘चांद्रयान-३’ मोहिमेचे यश हे भारताचे यश म्हणून गणले जाणार आहे. ते कोणत्याही पक्षाचे वा सत्ताधार्‍यांचे यश म्हटले जाणार नाही, एवढा साधा समजही प्रकाश राजला नाही. त्यामुळे प्रकाशला खरोखरच बुद्धीच्या प्रकाशाची गरज आहे, हे नक्की!


Powered By Sangraha 9.0