...म्हणून मंगोलिया महत्त्वाचा!

20 Aug 2023 21:09:46
Mongolia is in a unique position to facilitate talks between Ukraine and Russia

रशिया-युक्रेन युद्धात सर्वाधिक फटका बसला तो युक्रेनला. आजही पुन्हा नवा सूर्योदय पाहण्यासाठी युक्रेनी नागरिक आसुसलेले आहेत. परंतु, त्यासाठी युद्धविराम होणे तितकेच आवश्यक. डेन्मार्क, चीनसह अनेक आफ्रिकन नेत्यांनी युद्धविरामासाठी मध्यस्थीची तयारी दर्शवली होती. सौदी अरेबियाने तर एक संमेलन आयोजित करीत, या युद्धावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. या संमेलनात ४० देशांनी सहभागी घेत युद्ध थांबविण्याबाबत व युक्रेनच्या दशसूत्रीय शांती प्रस्तावावर चर्चा केली. मात्र, या संमेलनातून फारसे काही हाती लागले नाही. दरम्यान, युक्रेन आणि रशियामध्ये शांतता करार केला जाणार असेल, तर त्यासाठी मंगोलिया हा देश महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

दरम्यान, एकेकाळी चंगेझ खान याचे नाव ऐकताच विरोधी शासकांची झोप उडायची. हा चंगेझ मंगोलियनच होता. चंगेझने आपल्या आक्रमक शैलीने थेट युरोपात मंगोलियाचा झेंडा फडकावला होता. हाच मंगोलिया आता एक शांतिपूर्ण कृषिप्रधान आणि संसदीय लोकशाही असलेला देश म्हणून ओळखला जातो. स्थलरूप असलेल्या या देशाच्या सीमा पूर्व-पश्चिम-दक्षिणेला चीन आणि उत्तरेला रशियाला लागून आहे. मंगोलियाची सीमा कझाकिस्तानला लागून नसली, तरीही मंगोलियाच्या पश्चिमेपासून कझाकिस्तान केवळ ३८ किमी दूर आहे. उलानबटार ही मंगोलियाची राजधानी असून, तेच देशातील सर्वात मोठे शहर मानले जाते. याच शहरात देशातील तब्बल एक तृतियांश लोकसंख्या राहते. १९९० मध्ये मंगोलियाने ७० वर्षं जुन्या एकपक्षीय सोव्हिएत प्रणालीचा त्याग करत राजकीय आणि सामाजिक सुधारणा व बहुपक्षीय प्रणालीचा स्वीकार केला. दरम्यान, मंगोलिया रशिया आणि युक्रेनमध्ये समन्वयासाठी सध्या महत्त्वाचा का आहे, हे जाणून घेऊया.

कोणत्याही युद्धासंदर्भात चर्चा व कराराकरिता एक सुरक्षित, शांत आणि दोन्ही पक्षांना सहज वाटेल, अशी जागा असणे आवश्यक आहे. याच कारणामुळे उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील दोन शिखर वार्ता सिंगापूर आणि व्हिएतनाममध्ये पार पडल्या होत्या. या दोन्ही देशांनी चर्चेसाठी आपले दरवाजे खुले केले. मात्र, रशिया-युक्रेन प्रकरणी असे देश फार कमी आहेत, जिथे दोन्ही देश चर्चा करू शकतील. सध्यातरी यासाठी मंगोलिया हा एक महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो. कारण, दक्षिण कोरियापासून युक्रेनपर्यंत पसरलेल्या संपूर्ण महाद्विपीय युरेशियन विस्तारात मंगोलिया एकमात्र कार्यरत लोकशाही देश आहे.

मंगोलियाची स्वतःची स्वतंत्र खुली परदेश नीती आहे आणि याच कारणामुळे ’कोविड’ महामारी आधी जपान आणि उत्तर कोरियाच्या काही अधिकार्‍यांनी मंगोलियाशी गुप्तवार्ता केली होती. २०१८ सालीही किम-ट्रम्प शिखर संमेलनासाठी मंगोलियादेखील एक प्रमुख दावेदार होता. याव्यतिरिक्त मंगोलियाचे पश्चिमी देशांसोबत घनिष्ठ राजनयिक आणि सैन्य संबंध आहेत. मंगोलियन नागरिक दुसर्‍या देशांच्या तुलनेत युक्रेनी नागरिकांप्रती अधिक सहानुभूती बाळगून आहेत. तसेच मंगोलिया ऊर्जा क्षेत्राच्या गरजांकरिता ९० टक्के रशियावर अवलंबून आहे. त्यामुळेच मंगोलियाने संयुक्त राष्ट्रात रशिया-युक्रेन युद्धावरील मतदानाकरिता अनुपस्थित राहून अप्रत्यक्षरित्या रशियाचे समर्थन केले होते. त्या परिस्थितीला धरून मंगोलियाने हे उत्तम पाऊल उचलले होते.

पश्चिमी देशांनी रशियावर निर्बंध लादल्यानंतरही मंगोलियाने तसे केले नाही. मंगोलियाचे रशिया आणि युक्रेनसोबत मजबूत राजनैतिक संबंध आहेत. विशेष म्हणजे, युक्रेनचे राष्ट्रप्रमुख व्होल्दोमीर झेलेन्स्की यांनी त्यांची बालपणातील तीन वर्षं मंगोलियात व्यतीत केली आहेत, हे विशेष. मंगोलियातील प्रमुख तांब्याच्या खाणींच्या विकासात झेलेन्स्कींच्या वडिलांचा मोठा वाटा होता. मंगोलियात युक्रेनी संस्कृती आणि युक्रेनी लोकांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. भौगोलिक अडचणींमुळे मंगोलियाला रशियासोबत थेट शत्रुत्व पत्करता येत नसले तरी एक लोकशाही देश म्हणून मंगोलियाने रशियाच्या युद्धखोरीचा निषेध मात्र नोंदवला आहे. रशिया-युक्रेनमध्ये युद्धविरामासाठी, शांततेसाठी मंगोलियात चर्चा झाली, तर मंगोलिया या दोन्ही देशांसोबत निश्चितच संतुलन राखण्याचा प्रयत्न करेल. त्याचसोबत रशिया आणि युक्रेनदेखील चर्चेसाठी अनुकूलता दर्शवतील, अशी आशा. तेव्हा, मंगोलियात का होईना या युद्धाचा तोडगा निघतो का, ते पाहावे लागेल.

७०५८५८९७६७

Powered By Sangraha 9.0