नागपंचमी : कथा आणि व्यथा

    20-Aug-2023
Total Views |
Article On Hindu Festival Nag Panchami

हिंदू संस्कृतीत महत्त्व असलेला नागपंचमी हा सण विविध पद्धतींनी मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. यातील काही प्रथांमुळे होणारे परिणाम सोदाहरण सांगणारा हा लेख आजच्या नागपंचमी निमित्त...

आपला देश हा एक कृषिप्रधान देश आहे. म्हणूनच बहुदा आपल्या देशातील बहुतेक सणांची रचना शेतीच्या घडामोडी, पर्यावरणातील बदल आणि पर्यावरणात होत असलेल्या बदलांच्या अनुषंगाने आहे. याच सणांमार्फत आपल्या परंपरेत, झाडे, प्राणी, पक्षी, अगदी संपूर्ण जीवसृष्टी आणि पर्यावरणातील ठळक घटना यांची पूजा करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तुम्ही जर बारकाईने पाहिले तर आपल्याकडच्या कित्येक सणांमधून ही गोष्ट तुम्हाला जाणवेल. ही सणांची व्यवस्था, पर्यावरणाच्या नाजूक समतोलाबद्दल जागरूकता आणि समज वाढवण्यासाठी आणि निरोगी इकोसिस्टमशिवाय मानव कधीही जगू शकणार नाही, हे सत्य अधोरेखित करण्यासाठी केल्यासारखी वाटते. याच पद्धतीनुसार, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्ष पंचमीला आपण नागपंचमी म्हणून साजरी करतो.

आजचा तो दिवस. आज, सोमवार, २१ ऑगस्ट म्हणजेच नाग पंचमी. या दिवशी नाग देवतेच्या विविध रूपांची पूजा केली जाते. अशी मान्यता आहे की आज नागदेवतेची पूजा करून, महादेवाला रुद्राभिषेक केला, तर महादेव लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात. आज आपण याच नागपंचमी सणाबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया. नागपंचमी साजरी करण्यामागे अनेक कथा आहेत. एका कथेनुसार कृष्ण अवतारात कालिया नावाच्या नागाने सूड म्हणून संपूर्ण यमुना नदी विषारी केली. विषामुळे यमुना नदीचे पाणी पिऊन लोक आजारी पडू लागले. अशा स्थितीत भगवान श्रीकृष्णांनी यमुना नदीच्या आत बसलेल्या कालियाला बाहेर काढले आणि त्याच्याशी युद्ध केले. युद्धात कालियाचा पराभव झाला आणि त्याने यमुनेतील सर्व विष शोषून घेतले. भगवान श्रीकृष्णाने प्रसन्न होऊन, त्याला वरदान दिले की त्यांच्या या कर्तृत्वासाठी श्रावण शुक्ल पंचमीला नागपंचमीचा सण साजरा केला जाईल आणि नागांची पूजा केली जाईल.

नागपंचमी हा सण भारतात फार पूर्वीपासून साजरा केला जातो. अग्नी पुराण, स्कंद पुराण, नारद पुराण, गरुड पुराण आणि इतर अर्वाचीन ग्रंथांमध्येही नागपंचमीचा उल्लेख आढळतो. नागापंचमी मागील अजून एक कथा म्हणजे तक्षक नावाच्या महाभारतातील सर्पाची कथा. महाभारतात, ज्या दिवशी, अस्तिक ऋषींनी राजा जन्मेजयला यज्ञ करण्यापासून आणि सर्पांच्या संपूर्ण कुळाचा नाश करण्यापासून थांबवले तो आजचाच दिवस. हे यज्ञ, राजा जन्मेजय आपले वडील राजा परीक्षित याच्या मृत्यूचा सूड म्हणून करत होता. राजा परीक्षितला सर्पांचा राजा तक्षक याने मारले होते. श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमीला हा यज्ञ थांबवण्यात आला आणि तेव्हापासूनच हा दिवस नागपंचमीचा सण म्हणून साजरा केला जातो असे ह्या कथेत म्हटले गेले आहे.

संपूर्ण भारतामध्ये, नागपंचमीच्या सणादरम्यान, आपल्याला नागदेवतेच्या पूजेच्या अनेक परंपरा आणि पद्धती पाहायला मिळतात. भारतात अनेक ठिकाणी नागाच्या प्रतिकृतीला किंवा मूर्तीला आणि महादेवाच्या पिंडीला दूध वाहण्याची पद्धत आहे. परंतु अलीकडच्या काळात, पुराणकथेचा भाग म्हणून जिवंत सापांनाही दूध दिले जाते. देशाच्या काही भागांमध्ये, चांदीच्या भांड्यात ठेवलेल्या तांदळाची खीर आणि कमळाची फुलेही नागांना अर्पण केली जातात. चला आज आपण विचार करूया की ही प्रथा नक्की आहे तरी काय? नागपंचमी हा नक्कीच आपल्या देशातील एक प्रमुख सण आहे आणि म्हणूनच यामध्ये आपण श्रद्धा आणि अंधश्रद्धेतील फरक समजून घेणे आवश्यक आहे. या सणातील चिंतेची बाब म्हणजे नागाला जबरदस्तीने दूध पाजण्याची परंपरा. ही प्रथा समजून घ्यायला जरा आपण आधी नागपंचमी हा सण कधी असतो त्याचा विचार करू. मला खात्री आहे, नीट जर आपण या सणाचे विश्लेषण केले, तर खूप वेगळा अर्थ तुम्हाला दिसेल.

साप आणि नाग या सर्पाच्या प्रजाती आहेत आणि म्हणूनच त्यांना उष्णता सहन होत नाही. आषाढ महिन्यात झालेल्या पर्जन्यवृष्टीनंतर, आता जमीन छान ओली झालेली असते तसेच तापमान देखील बर्‍याच प्रमाणात कमी झालेले असते. अशा या वातावरणात, हे प्राणी आपल्या बिळातून बाहेर पडू लागतात. कारण काही ठिकाणी तर, बिळात देखील पाणी शिरलेले असते. आता या प्राण्यांचे मुख्य खाद्य काय, तर उंदीर, घुस, बेडूक आणि असे छोटे मोठे जीव. खाण्याच्या शोधात हे प्राणी जंगलात, शेतात फिरू लागतात.

आता, या काळात दरम्यान, शेतीमध्ये काय चालू असते? तर काही ठिकाणी मातीची मशागत, काही ठिकाणी पीक उभे राहू लागले असले तरी इतर ठिकाणी कापणीची तयारी चालू असते. खाण्यासाठी बिळाच्या बाहेर पडलेले प्राणी आणि मनुष्य हे या काळात एकमेकांच्या आड येऊ लागतात आणि निर्माण होतो तो संघर्ष. बर्‍याचदा अशा वेळी, त्या सर्पाची हत्या केली जाते. पण, खरीप हंगामाच्या शेवटी जेव्हा धान्य जमा करून ठेवायची वेळ येते, तेव्हा सर्पांची हत्या झाल्याने वाढलेली उंदरांची संख्या, मानवाला खूप त्रास देऊ शकते आणि आपल्या साठवलेल्या अन्नसाठ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकते. म्हणूनच श्रावणात, हा मानव आणि सर्प संघर्ष कमी व्हावा आणि सर्पांची हत्या होऊ नये या दृष्टीने साजरा केला जाणारा सण म्हणजे नागपंचमी.

आता दूध, दही, खीर याचा इथे काय संदर्भ? तर मूळ प्रथेप्रमाणे, सापाच्या बिळासमोर दूध, दही, खीर टाकली जायची. तसेच काही भागांमध्ये सुके तांदूळ किंवा कमळाची दांडी आणि फुले टाकली जायची. या सगळ्या गोष्टी, सापासाठी नसून, त्या वासामुळे घुस आणि उंदरांना तिथे आणण्यासाठी केले जायचे. जेणेकरून, सापाला त्याचे अन्न मिळेल, उंदरांची संख्या नियंत्रणात राहील आणि मानव-सर्प संघर्ष होणार नाही. आहे की नाही ही स्तुत्य प्रथा? आता शहरी भागांमध्ये किंवा गाव खेड्यांमध्ये या स्तुत्य उपक्रमाचे मात्र अंधश्रद्धेत रूपांतर झालेले दिसते. आपण कथांमधून सांगितल्या गेलेल्या गोष्टी शब्दशः घेतल्या आहेत आणि अनेक ठिकाणी सर्पांना जबरदस्तीने दूध पाजले जात आहे. आपण हे समजून घेणे आवश्यक आहे की दुधाचा प्रसाद जिवंत सापासाठी नसून नागदेवतेच्या मूर्तीला असावा. याचे कारण, दूध हे सर्पांचे प्रमुख अन्न नाही.

साप आणि नाग हे सरपटणारे प्राणी आहेत, ज्यांना दूध आणि त्याचे घटक पचवू शकायला लागणारी जीवरचना, बायोकेमिस्ट्री किंवा शारीरिक क्षमता नाही. दूध हा आहाराचा घटक म्हणून फक्त सस्तन प्राण्यांच्या वर्गात आढळतो आणि म्हणून सरपटणार्‍या प्राण्यांमध्ये तो चालत नाही. या वैज्ञानिक वस्तुस्थितीमुळे, सर्पाला बळजबरीने दिलेले दूध, त्याला भयंकर पोटदुखी देते आणि पचनसंस्थेमध्ये बिघाड झाल्याने अत्यंत आजारी करते. बहुतांश घटनांमध्ये, हे सर्प जगत नाहीत. म्हणून, दुर्दैवाने, परंपरांच्या चुकीच्या अर्थामुळे, श्रद्धेने आपण ज्या प्राण्याची प्रार्थना करायला जातो त्यालाच आपण मारत आहोत. मग, साप दूध का पितो? मला खात्री आहे, हा तुमचा पुढील प्रश्न असेल. 

या प्रकरणाशी निगडित असलेल्या अंधश्रद्धेमुळे आणि यामध्ये मिळू शकणार्‍या पैशांसाठी, साप पकडणारे सापासाठी इतकी गंभीर परिस्थिती निर्माण करतात, की त्याला दूध प्यावेच लागते. सणाच्या आधी दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ सर्पाला उपाशी ठेवून ही गोष्ट साध्य केली जाते. या घटनांचे अनेक पुरावे आपल्याकडे आहेत. काही गंभीर प्रकरणांमध्ये, साप खाऊ नये किंवा पाणीही पिऊ नये म्हणून या सापाचे तोंड शिवून टाकले जाते, असे देखील आढळून आले आहे. सणाच्या दिवशी जेव्हा अशा अशक्त आणि उपाशी असलेल्या प्राण्याला दूध दिले जाते तेव्हा त्याच्या निव्वळ बिकट अवस्थेमुळे तो दूध पितो. कारण, त्याला जगण्यासाठी प्रयत्न करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. पण हेच दूध, त्या गरीब प्राण्याला मारक ठरते. काही ठिकाणी भक्त अंधश्रद्धेपोटी सापाला भरभरून हळद आणि कुंकू वाहतात. पण, बर्‍याचदा यातील कृत्रिम घटकांमुळे, सर्पाला स्कीन अ‍ॅलर्जी आणि स्कीन इन्फेक्शन होते.

आपल्याला हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की सनातन धर्मातील कुठल्याच सणाची कुठलीही प्रथा कधीच कुणाच्याही वाईटासाठी नसू शकते, तर ही सर्पाला दूध घालणे आणि जीवंत सर्पाला पकडून त्याचा छळ करून पूजा करणे, ही प्रथा आपली असेल का? प्रत्येकाने हा विचार करणे महत्वाचे आहे. विरोध हा श्रद्धेला कधीच नव्हता, तो अंधश्रद्धेला आहे. सर्प हे शेतकर्‍यांचे मित्र असतात असे आपण लहानपणी पासून शिकत आलो आहोत. नागपंचमीचा सण हा याच सर्प आणि शेतकरी याच्या नात्याला वंदन करणारा सण आहे. आणि म्हणूनच या बद्दलची खरी माहिती आणि स्तुत्य भावना संगळ्यांपर्यंत पोहोचवणे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे असे मला वाटते. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

डॉ. मयुरेश जोशी