हिमोफिलियावरील उपचारांसाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र सुरू करणार : आरोग्यमंत्री तानाजी सावंत

02 Aug 2023 16:46:51
Health Minister Tanaji Sawant In Legislative Council

मुंबई
: राज्यात हिमोफिलियावरील उपचारांसाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र सुरू करणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विधानपरिषदेत केली. तसेच, ते म्हणाले हिमोफिलिया हा अनुवंशिक रक्तदोषामुळे होणारा आजार असून या आजाराच्या रुग्णांचा तपास, निदान व उपचारासाठी राज्यात नऊ ठिकाणी केंद्र असून येत्या काळात प्रत्येक जिल्ह्यात हे केंद्र सुरू करण्यात येईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, या रूग्णांमध्ये रक्त गोठण्याच्या फॅक्टर आठ आणि नऊ ची कमतरता असते. त्यामुळे अतिरक्तस्त्राव होतो. राज्यात सध्या जिल्हा रूग्णालय ठाणे, नाशिक, सातारा, अमरावती, औरंगाबाद, अहमदनगर आणि डागा स्त्री रूग्णालय नागपूर, केईएम रूग्णालय मुंबई आणि बी.जे.वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे या आजारावर मोफत उपचारासाठी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तसेच, सद्यस्थितीत विभागामार्फत नऊ केंद्रांना हिमोफिलिया फॅक्टरचा पुरवठा करण्यात येतो. या फॅक्टर्सच्या खरेदीसाठी केंद्र सरकारकडून २७ कोटी इतका निधी प्राप्त झाला. तर ५५ कोटी रूपये इतका निधी मंजूर असून त्याची खरेदीप्रक्रिया राज्यस्तरावर सुरू आहे. येत्या काळात सर्व जिल्ह्यांत डे-केअर केंद्र सुरू करून औषधपुरवठा करण्यात येणार असल्याचे मंत्री सावंत यांनी सांगितले.


Powered By Sangraha 9.0