नवी दिल्ली : भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा सुवर्ण भरारी घेण्यास सज्ज झाला आहे. नीरज चोप्रा जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ मध्ये भारताचे नेतृत्व करताना दिसणार आहे. अॅथलिट नीरज चोप्रा यांच्या नेतृत्वात २७ अॅथलेट्सची भारतीय तुकडी १९ ऑगस्टपासून बुडापेस्ट, हंगेरी येथे विेजेतेपदासाठी लढणार आहे.
दरम्यान, अॅथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप भारताच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंना जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळणार असून गेल्या वर्षी ऑलिम्पिक चॅम्पियन चोप्रा भालाफेकमध्ये रौप्यपदक मिळवणारा एकमेव भारतीय होता. परंतु, आता भारतीय ट्रॅक आणि फील्ड अॅथलीट्स चांगल्या फॉर्ममध्ये असून स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी टीम महिन्याच्या सुरुवातीपासून हंगेरीमध्ये तळ ठोकून आहे.
या टीममध्ये लाँग जम्पसाठी श्रीशंकर मुरली, जेस्विन ऑल्ड्रिन, भालाफेकपटू नीरज चोप्रा, ट्रिपल जम्पर प्रवीण चित्रवेल असून हे सर्वजण जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताचे नेतृत्व करण्यासाठी बुडापेस्टला पोहोचले आहेत. दरम्यान, भालाफेकपटू नीरज चोप्रासाठी दि. २५ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ०१:४० वाजता पुरुष भालाफेक पात्रता [गट अ] साठी तर दुपारी ३:१५ वाजता पुरुष भालाफेक पात्रता [ब गट] फेरी असणार आहे.