राज्य शासनाकडून रतन टाटांचा सन्मान !

19 Aug 2023 16:38:23

Ratan Tata


मुंबई : ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण रतन टाटा यांना उद्योग क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल आज महाराष्ट्र शासनाचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार देण्यात आला आहे. २५ लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
 
श्री. रतन टाटा यांना त्यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्रदान केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘टाटा म्हणजे ट्रस्ट, टाटा म्हणजे विश्वास अशी जगभर ख्याती असलेल्या उद्योग समूहाचे रतन टाटा यांना हा पुरस्कार देण्याने पुरस्काराचा सन्मान वाढला आहे, असे ते यावेळी म्हणाले.
 
तसेच पुढे ते म्हणाले की, मीठापासून ते वाहने, विमानांपर्यंत टाटा समूहाच्या उद्योगातून निर्मिती होते. टाटा समुहाने देशासह, जगभरात उद्योग क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. टाटा म्हणजेच विश्वास हे नाते आहे. राज्य शासनातर्फे उद्योग क्षेत्रातील योग्य व्यक्तीला पहिला पुरस्कार देण्यात येत असल्याचा आनंद आहे. या पुरस्काराने पुरस्काराचा मानसन्मान वाढला, उंची वाढल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, टाटा सन्सचे चेअरमन तथा महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा आदी उपस्थित होते.


Powered By Sangraha 9.0