गोविंदांना मिळणार विमा कवच - राज्यातील दहिहंडी समन्वय समितीला यश

19 Aug 2023 20:55:21
Dahihandi Insurance

ठाणे
: गोकुळाष्टमीला दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या राज्यातील गोविंदांना विमा कवच मिळणार आहे. सरकारच्या क्रीडा खात्यातर्फे शुक्रवारी एक परिपत्रक जारी करून राज्यातील ५० हजार गोविंदांना विम्याचे कवच देण्यात आले आहे. अशी माहिती आ.प्रताप सरनाईक यांनी दिली. दरम्यान, गोकुळाष्टमीच्या सुट्टी संदर्भात पुढील आठवड्यात निर्णय घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले असुन ३१ ऑगस्ट, रोजी मुंबई येथील वरळीच्या डोम या ऑडिटोरियममध्ये ’प्रो-गोविंदा“ स्पर्धेसाठी उद्योगमंत्री उदय सामंत व क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी एका बैठकीचे आयोजन केल्याचे आ.सरनाईक यांनी सांगितले.

गोकुळाष्टमीच्या दिवशी राज्यात शासकिय सुट्टी जाहिर करून खाजगी कंपन्यांनाही त्या दिवशी सुट्टी देण्यात यावी. तसेच राज्यातील ५० हजार गोविंदांना शासनाच्या क्रीडा खात्याच्यावतीने विमा संरक्षण द्यावे व यावर्षी प्रो-कबड्डीच्या धर्तीवर ’प्रो-गोविंदा“ स्पर्धा सुरु करण्याची विनंती आ. प्रताप सरनाईक व युवासेनेचे पुर्वेश सरनाईक यांनी अधिवेशन काळात मुख्यमंत्र्याकडे केली होती. दरवर्षी गुरूपोर्णिमेच्या दिवशी चालू होणार्या सरावापासून ते गोकुळाष्टमीच्या दिवसापर्यंत दहिहंडी सराव करीत असताना अनेक गोविंदा जायबंदी होत असतात, तर गोकुळाष्टमीच्या दिवशी हा आकडा मोठा होत असे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी दहिहंडी समन्वय समितीच्या पदाधिकार्यांसह बैठक देखील घेतली होती. त्यानुसार आता ५० हजार गोविंदाना विमा कवच देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे गोविंदांना आर्थिक संरक्षण मिळणार आहे.
Powered By Sangraha 9.0