खालच्या पातळीवरील भाषा कदापि सहन करणार नाही; भातखळकरांचा राऊत - ठाकरेंना इशारा

19 Aug 2023 21:10:19
Atul Bhatkhalkar on Samana

मुंबई : मेट्रो पासून एसआरए पर्यंतच्या अनेक विकास कामे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गी लावली. त्यांच्या बद्दल बोलण्यासारखे काही नसल्याने 'सामना'त त्यांच्याबद्दल अत्यंत खालच्या भाषेचा वापर करण्यात आला आहे. त्याचा निषेध म्हणून आज आम्ही 'सामना' वृत्तपत्राची होळी केली. हा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी इशारा समजावा. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हे कदापि सहन करणार नाही, असा इशारा भाजप नेते आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज दिला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत 'सामना' मध्ये खालच्या भाषेचा वापर करण्यात आल्याच्या निषेधार्थ आमदार भातखळकर यांच्या नेतृत्वखाली सामना वृत्तपत्राची आज होळी करण्यात आली, यावेळी आ. भातखळकर बोलत होते.ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या विकासाची अनेक कामे केली. सामान्य मुंबईकरांना दिलासा दिला. त्यांच्याबाबत अशा खालच्या दर्जाच्या भाषेचा वापर आम्ही सहन करणार नाही. मुंबई महापालिकेच्या २३६ जागांसाठी तेच सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. हिंमत असेल तर सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घ्या मग 'दूध का दूध और पाणी का पाणी' होईल, असेही आमदार भातखळकर म्हणाले. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी संजय राऊत यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.




Powered By Sangraha 9.0