श्रावण मास : व्रतवैकल्यांचा महिना

19 Aug 2023 21:57:30
Article On Indian Calender Shravan Mas

चातुर्मासातील चार महिन्यांपैकी ‘श्रावण’ हा एक महत्त्वाचा महिना. गुरुवार, दि. १७ ऑगस्टपासून निज श्रावण मासारंभ झाला. त्यानिमित्ताने सण-उत्सवांचा महिना म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्रावण महिन्यातील व्रतवैकल्यांची माहिती सांगणारा हा लेख...

चातुर्मासातील चार महिन्यांपैकी ‘श्रावण’ हा सर्वश्रेष्ठ मानला गेला आहे. चैत्र महिन्यांपासून मासगणनेतील श्रावण हा पाचवा महिना. श्रावण पौर्णिमेला किंवा तिच्या जवळपास सूर्यास्ताला ‘श्रवण’ नक्षत्र दिसते म्हणून या महिन्याला ‘श्रावण’ हे नाव दिले गेले. हा महिना दक्षिणायनात येतो. या महिन्यात पावसामुळे भूमीने हिरवा शेला पांघरलेला असतो. पारिजात, सोनचाफा, जाईजुई यांना बहर येतो. मन प्रसन्न होते. श्रावण महिन्यात जवळ-जवळ प्रत्येक दिवशी कोणते ना कोणते धर्मकृत्य सांगितलेले आहे. या महिन्यात अनेक सण येतात. शुक्ल पंचमीला नागपंचमी असते. त्यादिवशी नागाची पूजा करतात. पौर्णिमेला ‘नारळी पौर्णिमा’ म्हणतात. वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राला नारळ अर्पण करतात. या पौर्णिमेला ’राखी पौर्णिमा’ असेही म्हटले जाते. यादिवशी सुताची पोवती करून ती विष्णू, शिव, सूर्य इत्यादी देवतांना अर्पण करतात. या दिवशी श्रवण नक्षत्र असेल, तर पुरुष उपाकर्म (श्रावणी) करून नवीन जानवे धारण करतात. श्रावण वद्य अष्टमीला ‘श्रीकृष्ण जन्माष्टमी’ असते. अष्टमीला श्रीकृष्णाचा जन्म झाला. हा भाविकांचा उपवासाचा दिवस, श्रीकृष्णाचा जन्म सोहळा. ‘श्रावण अमावास्या’ म्हणजे ’पिठोरी अमावास्या.’ संतती प्राप्तीसाठी स्त्रियांचे व्रत. याच दिवशी शेतकर्‍यांचा पोळ्यांचा सण. यादिवशी बैलांना शृंगारून त्यांची मिरवणूक काढतात.

दर रविवारी सकाळी उठताच मौन धरून स्नान केल्यावर गभस्तीची (सूर्याची) पूजा करून रविवारची (आदित्यराणूबाईची) कहाणी श्रवण करतात.

दर सोमवारी उपवास करून महादेवावर अभिषेक करून शिवामूठ अर्पण केली जाते. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसर्‍या सोमवारी तीळ, तिसर्‍या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस आणि पाचव्या सोमवारी सातू उजव्या हातात मूठभर घेऊन ती अर्पण करतात.

दर मंगळवारी नवविवाहित स्त्रिया पहिली पाच वर्षे मंगळागौरी पूजन करतात.

दर बुधवारी बुध बृहस्पती पूजन करतात. दर गुरुवारीही बुध बृहस्पती पूजन करतात. दर शुक्रवारी स्त्रिया लक्ष्मीची पूजा करतात. जरा-जीवन्तिका पूजन करतात. पुरणपोळी करून सवाष्णीला जेवायला घालतात. संध्याकाळी हळदीकुंकवाचा कार्यक्रम करून दूध फुटाणे देतात. दर शनिवारी नृसिंह-पिंपळ-शनी-मारुती यांचे पूजन करतात. एखाद्या मुंजा मुलाला घरी बोलावून तेल लावून आंघोळ घालतात व त्याला जेवायला घालतात. काही स्त्री-पुरूष यादिवशी एकभुक्त राहातात.

उत्तर भारतात या महिन्यात झुलन जात्रा (दोलोत्सव), रक्षाबंधन, जन्माष्टमी, नंदोत्सव साजरा होतो. पौर्णिमेला राधा व कृष्ण यांना हिंदोळ्यावर बसवून झोके देतात. शिवाय, श्रावण शुक्लपक्षातील तृतीयेस गौरी आंदोलन व्रत, पंचमीस नागपंचमी व्रत, षष्ठीस श्रियाळ षष्ठी व्रत, सप्तमीस शीतला सप्तमी व्रत, दुसर्‍या शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत, एकादशीस पुत्रदा एकादशी व्रत, पौर्णिमेला रक्षाबंधन. कृष्णपक्षातील अष्टमीला ‘जन्माष्टमी व्रत’ आणि श्रावण अमास्येला ‘पिठोरी व्रत,’ अशी विविध व्रते केली जातात. शिवाय, चातुर्मासातील नियम चार महिन्यांत पाळता आले नाहीत, तर श्रावणात तरी कटाक्षाने पाळतात.

श्रावणात मद्य, मांसाहार, कांदा-लसूण निषिद्ध मानले जाते. शिवाय स्त्रीसंग, केशकर्तन, पाद (पादत्राणे)संवाहन आदी नियम चातुर्मासात ज्यांना शक्य नसते, ते निदान श्रावणात पाळतात. श्रावणात शाकभाज्या वर्ज्य करतात.

श्रावण महिन्यात मंदिरात रामविजय, पांडवप्रताप आदी एखाद्या धार्मिक ग्रंथांचे सार्वजनिक वाचन करतात.

श्रावण मासातील विशेष व्रते

१. अर्ध श्रावणिक व्रत- श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून अमावास्येच्या महिनाभर एकभुक्त किंवा नक्त (रात्री) भोजन. पार्वतीची पूजा करतात. उद्यापनाच्या दिवशी ब्राह्मण आणि कुमारिकाना भोजन घालतात.

२. श्रावण सोमवार : श्रावण महिन्यात दर सोमवारी, हे व्रत करतात. याला शिवमुष्टी (शिवामूठ) व्रत. हे व्रत स्त्रिया पहिली पाच किंवा १६ वर्षे करतात. दर सोमवारी शिवामूठ मंदिरात वाहतात.

३. मंगळागौरीव्रत : नवविवाहित स्त्रिया दर मंगळवारी विवाहोत्तर पाच किंवा १६ वर्षे हे व्रत करतात. हे अखंड सौभाग्यदायक व्रत आहे. मंगळागौरीव्रतात १६ या संख्येस विशेष महत्त्व आहे. १६ वृक्षांची पत्री, पूर्णपणे १६ दिवे लावून आरती करतात. १६ मुली एकत्र येऊन व्रत करतात. दुसर्‍या दिवशी उत्तरपूजा करतात.

४. वरदलक्ष्मी व्रत : श्रावण महिन्याच्या दुसर्‍या शुक्रवारी हे व्रत करतात. शरदः लक्ष्मीचे व्रत लक्ष्मीच्या इतर काही व्रतांप्रमाणे प्रदोष समयी (सायंकाळी) करतात. हे एक प्रभावी व्रत आहे. हे व्रत स्त्रिया तसेच पती-पत्नी संयुक्तपणे ही करू शकतात.

५. पवित्रार्पण विधी : श्रावण शुक्ल एकादशीला देवांना पवित्रक (पोवते) अर्पण करतात. सुताचे वा रेशमाचे पवित्रक करतात. पोवते एकमेकांना ही बांधतात.

६. मंगळागौर व्रत

७. संपत् शनिवार व्रत

८. आयुध व्रत : श्रावण महिन्यापासून चार महिने वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध यांची प्रतीके म्हणून श्रीविष्णूचे शंख, चक्र, गदा आणि पद्म यांची पूजा करतात.

श्रावण शुक्ल पक्षातील व्रते

१. विनायक चतुर्थी
२. नागपंचमी
३. श्रियाळ षष्ठी, वर्ण षष्ठी
४. सीतला सप्तमी, पापनाशिनी सप्तमी
५. वरदलक्ष्मी व्रत
६. पुत्रदा एकादशी
७.शुक्ल द्वादशी-दधिव्रत, पंचमहापापनाशन व्रत
८. त्रयोदशी-प्रदोषव्रत
९. श्रावण पौर्णिमा-ऋषितर्पण, श्रवणपूजन
१०. श्रावणी-उपाकर्म (श्रावणी) श्रवण नक्षत्र दिवशी, हस्तनक्षत्र दिवशी, पंचमीस, श्रावण पौर्णिमेला करतात.
श्रावण वद्य पक्षातील व्रते
१. श्रावण वद्य प्रतिपदा-गोकुळाष्टमी नवरात्र (देशस्थ ऋग्वेदी)
२. श्रावण वद्य तृतीया-बुढी तीज, विशालाक्षी यात्रा
३. श्रावण वद्य चतुर्थी-गोत्र व्रत (बैल चौथ), संकष्ट चतुर्थी
४. श्रावण वद्य षष्ठी- चंद्र षष्ठी (मुली), छानाछट् (मारवाडी समाज)
५. श्रावण वद्य सप्तमी- पुत्रव्रत, ललितासखी व्रत.
६. श्रावण वद्य अष्टमी-उमा महेश्वर व्रत, कालाष्टमी, कृष्णजन्म अष्टमी, जयंतीव्रत
७. श्रावण वद्य नवमी-दुर्गाबोधन
८. श्रावण वद्य एकादशी-कृष्णाशी
९. श्रावण वद्य द्वादशी-वत्स द्वादशी
१०. श्रावण वद्य त्रयोदशी-प्रदोष व्रत
११. श्रावण अमावस्या-कुशग्रहणी, सतिपूजन, दर्शश्राद्ध.

हा श्रावण महिना सर्वांना आनंदाचा जावो.

भालचंद्र जोशी

Powered By Sangraha 9.0