मुंबई : पाकिस्तानातून भारतात आल्यामुळे सीमा हैदर चर्चेत होती, पण आता तिच्यावर चित्रपट येत असल्यामुळे आता अधिकच चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपुर्वी सीमा हैदरवर चित्रपट करणार असल्याची घोषणा निर्माते अमित जानी यांनी केली होती. त्यानंतर सर्वच स्तरातून याला विरोध करण्यात आला होता. महाराष्ट्रात तर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्य़क्ष अमेय खोपकर यांनी बॉलिवूडला धमकीच दिली होती. मात्र, असे असतानाही चित्रपट येत असून'कराची टू नोएडा' असे या चित्रपटाचे नाव निश्चित करण्यात आले आहे. शिवाय चित्रपटातील पहिले गाणे लवकरच प्रदर्शित होणार असून त्याचे पहिलं पोस्टरही रिलीज झालं आहे.
पाकिस्तानची सीमा हैदर आणि नोएडाच्या सचिन मीना यांची प्रेम कहानी आहा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. सचिनवरील प्रेमासाठीच सीमा पाकिस्तानची सीमा पार करुन भारतात आली. मात्र ती गुप्तहेर असल्याचा संशय आल्यामुळे सध्या तिची चौकशी सुरु आहे. दरम्यान, हीच गोष्ट 'कराची टू नोएडा' या चित्रपटात दाखवली जाणार असून सीमाच्या भूमिकेत मॉडेल फरहीन फलक दिसणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शक भरत सिंह करणार आहेत.
कराची टू नोएडा चित्रपटातील पहिलं गाणं 'चल पडे है हम' २० तारखेला प्रदर्शित होणार आहे. पोस्टरमध्ये मॉडेल फरहीन फलकचे तीन लुक दाखवले असून फरहीनचा चेहरा सीमा हैदरशी फारच मिळता जुळता वाटतो. सीमा आणि सचिन यांची प्रेमकहाणी फारच वेगळी आहे. पबजी गेम खेळता खेळता त्यांच्यात प्रेम झालं आणि त्यांचं प्रेमप्रकरण इतकं वाढलं की दोन मुलांची आई असलेली सीमा सगळं सोडून लपतछपत पाकिस्तानातून भारतात आली. आता दोघेही कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत.