मुंबई (ओंकार मुळ्ये) : हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसाने चांगलेच थैमान घातल्याचे दिसून आले. दि. १० ऑगस्टपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शिमला येथे अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस आणि भूस्खलनसारखे प्रकार घडले. समरहिल शिव बावडी मंदिराजवळ दरड कोसळ्याने अनेक भाविक या ढिगाऱ्याखाली दबले गेले. अशा संकटप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक कुठल्याही मदतकार्यासाठी तातडीने उभे राहतात याची प्रचिती पुन्हा एकदा दिसून आली. मंदिर परिसरातील भूस्खलनात अडकलेल्या भाविकांचे बचावकार्य, त्यांना तातडीने आरोग्य तपासणीसाठी नेणे तसेच त्यांच्या खाण्यापिण्याची-राहण्याची व्यवस्थी करणे अशी अनेक सेवाकार्य सध्या येथील स्वयंसेवकांकडून सुरु आहेत.
शिव बावडी मंदिरात सकाळी सातच्या सुमारास साधारण २० ते २५ भाविक दर्शनासाठी आले होते. यावेळी अचानक झालेल्या भूस्खलनात मंदिर व आजूबाजूचा परिसर ढिगाऱ्याखाली वाहून गेला. दर्शनासाठी आलेले भाविकही यात दबले गेले. ही घटना लक्षात येताच प्रशासन, एसडीआरएफ आणि एनडीआरएफची टीम पोहोचण्यापूर्वीच संघ स्वयंसेवक आणि स्थानिक लोकांच्या सहाय्याने मदतकार्य सुरू झाले. सुरुवातीला ढिगाऱ्याखाली दबल्या गेलेल्या आणि मलब्यालगत अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने नजीकच्या आयजीएमसी रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी नेण्यात आले. जखमींना प्राथमिक उपचारानंतर त्यांच्या घरी पाठवण्यात आले.
याचदिवशी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत छिन्न-विछिन्न झालेले मृतदेह संघ स्वयंसेवक आणि प्रशासनाच्या मदतीने आयजीएमसी रुग्णालयात नेण्यात आले. इतर बाधीतांसाठी या स्वयंसेवकांनी प्राथमिक गरज म्हणून बेड, अन्न आणि पाण्याची व्यवस्था केली, तसेच त्यांच्या नातेवाईकांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यास मदत केली. पहिल्या दिवसापासून सुरु असलेली ही व्यवस्था अजूनही सुरु आहे, अशी माहिती येथील एका स्थानिक स्वयंसेवकाने दिली.