सामूहिक प्रयत्नांद्वारेच विजय शक्य : पंतप्रधान नरेंद्र मोदी
18 Aug 2023 17:35:05
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दमन आणि दीव मध्ये आयोजित पंचायत राज परिषदेला आभासी पद्धतीने संबोधित केले. कार्यक्रमातून पंतप्रधानांनी कार्यकर्त्यांना विजयाचा कानमंत्र दिला.
कार्यकर्त्यांना संबोधित करतांना पंतप्रधान म्हणाले की, आपण संघटना, संस्कार आणि समपर्णावर विश्वास ठेवतो. सामूहिकतेची मूल्ये आणि सामूहिक जबाबदारीसह आपण मार्गक्रम करीत आहोत. अशात जी जबाबदारी मिळाली त्यामाध्यमातून सातत्याने आपली योग्यता आणि कौशल्य वाढवावे, असे आवाहन यानिमित्ताने पंतप्रधानांनी केले. क्षेत्रीय पंचायत राज परिषद कार्यक्रमात महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, गोवा आणि दमण-दीव चे भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते.
संपूर्ण जिल्ह्यातील सर्वसामान्य नागारिक जोडले जातील, असे वर्षभरातून किमान ४ ते ५ कार्यक्रम सरकारच्या, पंचायतच्या नेतृत्वात आयोजित करण्याच्या सूचना देखील पंतप्रधानांनी कार्यकर्त्यांना दिल्या. यापूर्वी ७० हजार कोटींचे अनुदान मिळत होते,आज ते ३ लाख कोटींहून अधिकच्या घरात पोहचले आहे. आतापर्यंत ३० हजारांहून अधिक नवीन जिल्हा पंचायत भवन उभारले असल्याचे पंतप्रधान म्हणाले. गुजरातमध्ये मुख्यमंत्री असतांनापासूनच्या संघटन मजबूत करण्यावर प्राधान्य दिल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. त्यामुळे सामूहिक प्रयत्नांद्वारे विविध विषयांची अंमलबजावणी करणे शक्य झाले होते. संघटनेमूळे स्थानिक पातळीवरील माहिती लवकर मिळते. ही माहिती संबंधित अधिकाऱ्यांपुढे ठेवल्यावर त्यांनादेखील योजना राबविण्यास मदत होत असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले आहे.