ठाणे : १९ ऑगस्ट या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ’ठाणे महापालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ' यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य राष्ट्रीय छायचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ठाण्यात १८ ते २० ऑगस्ट दरम्यान हे प्रदर्शन आयोजित केले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार आहे. तसेच मुख्य अतिथी म्हणुन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत. यावेळी आ. संजय केळकर, आ.निरंजन डावखरे, ठामपा आयुक्त अभिजीत बांगर अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती असेल. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते प्रदर्शनाच्या समारोप दिनी पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार आहे. जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधुन ’ठाणे महापालिका चषक २०२३' या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध छायाचित्रकार तसेच नागरिकांकडून या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला.
छायाचित्र स्पर्धेसाठी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरुन ३ हजार १९६ प्रवेशिका आल्या असून सुमारे १२ हजार ५५७ छायाचित्रे प्राप्त झाली. नामवंत छायाचित्रकारांकडून प्राप्त झालेल्या छायाचित्रांचे परीक्षण करण्यात आले. १८, १९ व २० ऑगस्ट या कालावधीत स्पर्धेतील विजेत्या तसेच काही निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक, इटर्निटी सर्व्हिस रोड, तीनहात नाका, ठाणे (प.) याठिकाणी हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
यासोबतच १९ व २० ऑगस्ट रोजी छायचित्रकारांसाठी अत्याधुनिक तंत्राद्वारे सर्जनशील छायाचित्रण व ३६० अंशातील छायाचित्रण कार्यशाळेचे प्रदर्शनस्थळी आयोजन करण्यात आले आहे. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ व ठाणे महापालिकेच्यावतीने सर्व नागरिकांना या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.