पाटना : 'गदर २' च्या तिकिट आणि पार्किगवरून पाटण्यातील एका सिनेमा हॉलबाहेर गदारोळ झाला. एवढेच नाही तर पार्किंगजवळ बॉम्बस्फोटही झाले. मात्र त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोरांनी दोन बॉम्ब फेकल्याची माहिती मिळाली आहे. त्यापैकी एकाचा स्फोट झाला. तसेच सिनेमा हॉलची मालकीण सुमन सिन्हा यांनी दावा केला आहे की, ' हल्लेखोरांनी तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांना धमकावले'.
दरम्यान चित्रपटगृह मालकाने आरोप केला की 'गदर २ ची तिकिट ब्लॅक करताना काही लोकांना पकडल्याने हा त्रास सुरू झाला. तसेच हल्लेखोरांना अटक करण्यात आले आहे. मीडियाशी बोलताना थिएटरच्या मालक सुमन सिन्हा यांनी सांगितले की, 'हे काही पहिल्यांदा घडले नाही. हे होत राहते. वाईट हेतू असलेले लोक येतात.आणि अशा घटना घडवून आणल्या जातात.
त्यांनी पुढे सांगितले की, 'आम्ही त्यांना चित्रपटाची तिकिटे ब्लॅक करण्याची परवानगी द्यावी, अशी त्यांची इच्छा होती, जे चुकीचे आहे. आम्ही ते करू शकत नाही. उपलब्ध असलेली सर्व तिकिटे चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांना द्यावीत, अशी आमची इच्छा आहे. त्यांनी माझ्या कर्मचाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला'. थिएटर स्टाफ कधीच कमकुवत नसतो. अशा चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांना आळा घालण्याचा या सर्वांचा मानस आहे, असे सिनेमागृहाच्या मालकाने सांगितले.
सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा चित्रपट 'गदर २' बॉक्स ऑफिसवर 'गदर' निर्माण करत आहे. रिलीजच्या ७ दिवसांत या चित्रपटाने २२८ कोटींची कमाई केली आहे, त्यानंतर या आठवड्यात चित्रपट ३०० कोटींचा टप्पा सहज पार करेल, अशी अपेक्षा आहे.