राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्याहेतू "तिरंगा उठवो मोहीम"

16 Aug 2023 20:59:12
National Flag news

मुंबई : देशाला स्वातंत्र्य हे फुकटचे मिळाले नाही आहे त्याची जाणीव आपल्या सर्वाना असणे गरजेचे आहे त्यामुळेच देशाच्या राष्ट्रध्वजाचा सन्मान हा झालाच पाहिजे. राष्ट्रध्वजाचा सन्मान फक्त प्रजासत्ताक दिनी व स्वातंत्र्य दिनी नाही तर सदैव त्याचे स्थान हे उंच असले पाहिजे. "विजयी विश्व तिरंगा प्यारा झण्डा ऊँचा रहे" हे फक्त गीत नसून त्यापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. गेल्या १८ वर्षांपासून ज्ञानदा प्रबोधन संस्था व राष्ट्राभिमानी सेवा समितीने पदपथावर पडलेले राष्ट्रध्वज सन्मानाने उचलण्यासाठी तिरंगा उठवो मोहीम सुरु केली. आज त्या मोहिमेद्वारे आम्ही राष्ट्र ध्वज गोळा केले. मनाला दुःखी करणारे दृश्य दिसले ते म्हणजे मनपा घनकचरा विभागाचे साफ सफाई कर्मचारी जे नित्यनियमाने मुंबईतील रस्ते पहाटे स्वच्छ करतात पण ते करत असताना त्यांनी कचऱ्यासोबत काही ठिकाणी राष्ट्र्ध्वजही केरसुणीने कचऱ्यात जमा केलेले संस्थेच्या निदर्शनात आले.

त्यानंतर संस्थेने हे असे पुन्हा होऊ नये त्याकरिता परिपत्रक काढून सर्वच शासकीय विभागाला राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्याचे निर्देश देण्यात यावे त्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व मनपा आयुक्तांना विनंती पत्र इमेलद्वारे व ट्विटरद्वारे पाठवले आहे. तिरंगा उठवो मोहिमेत संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पळ व पदाधिकारी रुपेश शिगवण, भास्कर देवाडिगा, नितीन येंडे,मनोज मिसाळ ,राजेश पवार, राज दुदवडकर हे सर्व तळमळीने भाग घेऊन पदपथावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करतात. कृपया समस्त देश बांधवानी आपल्या राष्ट्रध्वजाचा सन्मान करावा तसेच कुठेही पदपथावर राष्ट्रध्वज पडलेला निदर्शनास आला तर तो सन्मानाने उचलावा , असे आवाहन ही त्यांनी यानिमित्ताने केले आहे.


Powered By Sangraha 9.0