पुणे : ‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय बाबासाहेबांच्या वडिलांच्या नावे दिली जाणारी ‘श्रीमंत मोरेश्वर बळवंत पुरंदरे’ शिष्यवृत्ती ही यावर्षी इतिहास अभ्यासक प्रसाद तारे यांना प्रदान करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा महाराष्ट्र कीर्ति सौरभ प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटवार यांच्या हस्ते तसेच, पुण्याचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार दोन्ही मान्यवरांना प्रदान करण्यात येणार आहे. रविवार दि. २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात येणार आहे.