कळवा रुग्णालय प्रकरण; हलगर्जी झाल्यास विभागप्रमुख जबाबदार, महापालिका आयुक्तांची तंबी

15 Aug 2023 22:24:35
TMC Commissioner On Kalwa Hospital Case

ठाणे :
ठाण्यातील कळवा रुग्णालयातील मृत्यु रोखण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर सरसावले असुन त्यांनी संपुर्ण रुग्णालय प्रशासनालाच 'डोस' पाजला आहे. रुग्णालयात आलेल्या सर्व रुग्णांना दाखल करुन सर्वोच्च रुग्ण्सेवा देण्यास प्राधान्य देण्याचे बजावुन हलगर्जी झाल्यास संबधित विभागाच्या प्रमुखालाच जबाबदार ठरवण्यात येणार असल्याची तंबी आयुक्तांनी दिली आहे.त्याचप्रमाणे कळवा रुग्णालयात प्रशासकिय बदल केले असुन अधिष्ठाता व डॉक्टरांवर प्रशासकिय कामकाजाचा कोणताही बोजा नसणार आहे.ही जबाबदारी कार्यालयीन अधिक्षक व लिपिकावर सोपवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कळव्याच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत सर्व विभागप्रमुखांना सक्त सूचना दिल्या.कोणत्याही परिस्थितीत रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला उपचार मिळतील याबाबतची काळजी सर्व विभागप्रमुखांनी घ्यावी. रुग्णालयातील प्रत्येक विभागाच्या रुग्णकक्षामध्ये काटेकोर शिस्तीचे पालन होईल याला संबंधित विभागप्रमुख जबाबदार राहतील.दिवसातून दोन पेक्षा जास्तवेळा विभागप्रमुख स्वत: प्रत्येक रुग्ण्कक्षेमध्ये राऊंड घेऊन रुग्णाची परिस्थिती तपासून आवश्यकतेनुसार कार्यवाही करतील. या व्यतिरिक्त अधिष्ठाता यांनीही दररोज किमान दोन विभागांच्या रुग्ण्कक्षामध्ये राऊंड घेणे बंधनकारक राहील अशाही सूचना यावेळी आयुक्तांनी दिल्या.

रुग्णालयाच्या प्रशासकीय कामकाजात देखील आयुक्तांनी बदल केले असून नवीन कार्यालयीन अधीक्षक व लिपिकांची नेमणूक करण्यात आली आहे.यापुढे मुख्यालयाला सादर करण्यात येणारे प्रस्ताव व इतर सर्व प्रशासकीय कामे ही वैद्यकीय अधिष्ठाता व डॉक्टर्स यांनी न करता सर्व कामे ही कार्यालयीन अधीक्षकांच्या मार्फत करण्यात यावीत. असेही आयुक्तांनी बजावले आहे.


Powered By Sangraha 9.0