भारत जगाला जागृत करण्यास सक्षम : डॉ. मोहनजी भागवत

15 Aug 2023 15:09:59
Dr. Mohanji Bhagwat on Independence Day

नवी दिल्ली
: भारताला आपली क्षमता वाढवण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी दि. १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त व्यक्त केले. सरसंघचालक म्हणाले की, देश आपल्या सांस्कृतिक ताकद आणि क्षमतांच्या जोरावर जगासाठी आशेचा किरण बनू शकतो. ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त डॉ. मोहनजी भागवत यांनी कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये ध्वजारोहण केले. समर्थ भारत संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

देश, जगाला जागृत करण्यास सक्षम

डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, "देशाने तिरंग्यापासून प्रेरणा घेऊन पुढे जावे आणि जगाचे नेतृत्व करावे. मात्र, देशविरोधी शक्तींना आपण पुढे जावे असे वाटत नाही. भारत जगाला जागृत करण्यास सक्षम आहे, परंतु काही शक्ती भारताची प्रगती रोखू इच्छितात. त्यांच्यापासून सावध राहून आपल्या राष्ट्रध्वजात दडलेल्या संदेशानुसार काम करून देश एकसंध ठेवला पाहिजे. जेणेकरून नकारात्मक शक्ती यशस्वी होऊ शकत नाहीत."

राष्ट्रध्वजाबद्दल स्पष्टीकरण देताना सरसंघचालक म्हणतात, "ध्वजाच्या शीर्षस्थानी असलेला भगवा रंग त्यागाचा प्रतिक आहे, जो जीवनाला तमसो मा ज्योतिर्गमय (अंधारातून प्रकाशाकडे) नेतो. पांढरा रंग कोणत्याही स्वार्थाशिवाय शुद्धतेने काम करण्याचा प्रतिक आहे. हिरवा रंग श्री लक्ष्मी (संपत्ती) चा प्रतिक आहे जो बुद्धिमत्ता, विश्वास आणि निःस्वार्थ शक्ती प्राप्त करण्यास मदत करतो."

पुढे ते असेही म्हणाले की, "भारत जगाला शहाणपण, शुद्धता, समृद्धी आणि समर्पण शिकवू शकतो. आपण सूर्याची पूजा करतो, म्हणूनच आपल्याला भारत म्हटले जाते, ज्यामध्ये बहा म्हणजे प्रकाश. जगाला जागे करण्यासाठीच भारताला स्वातंत्र्य मिळाले."



Powered By Sangraha 9.0