नवी दिल्ली : जम्मू – काश्मीरमधील नागरिकांसोबत आता न्याय होत असून त्यांच्या विकासासाठी भरीव प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे दहशतवादी झालेल्यांनी आता आत्मसमर्पण करावे, असे आवाहन दहशतवाद्यांच्या कुटुंबियांनी तिरंगा फडकावून केले आहे.
गतवर्षीप्रमाणेच यंदाच्या वर्षीही देशभरात ‘घरोघरी तिरंगा – हर घर तिरंगा’ ही मोहिम साजरी केली जात आहे. देशातील सर्व राज्यांमध्ये नागरिक स्वयंस्फूर्तीने यामध्ये सहभाग घेत आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी जम्मू – काश्मीरमध्ये ज्या कुटुंबातील तरूणांनी दहशतवादी संघटनांचा मार्ग धरला आहे, त्यांनीदेखील तिरंगा फडकावून आपल्या मुलांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले आहे.
काश्मीर खोऱ्यात २००९ सालापासून सक्रीय असलेल्या लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी जावेद अहमद मट्टू याचा भाऊ रईस अहमद मट्टू याने तिरंगा हाती घेऊन आपल्या भावास परत येण्याचे आवाहन केले. रईस मट्टू म्हणाले. तिरंगा फडकविण्यासाठी माझ्यावर कोणताही दबाव नसून मी मनापासून तिरंगा फडकविला आहे. अनेक वर्षांनी प्रथमच १४ ऑगस्ट रोजी मी माझे दुकान उघडून व्यवसाय करू शकत आहे. यापूर्वी १५ ऑगस्टपूर्वी आणि नंतर दोन ते तीन दिवस दुकान बंद ठेवावे लागत असे, कारण येथील राजकीय पक्ष त्यांचे राजकारण खेळत असत.
आता मात्र काश्मीरचा विकास होत असून जनतेला न्याय मिळत आहे. माझा भाऊ २००९ साली दहशतवादी बनला, त्यानंतर त्याच्याशी आमचा कोणताही संबंध आणि संपर्कही नाही. मात्र, तो जर जिवंत असेल तर त्याने आत्मसमर्पण करावे. कारण, पाकिस्तान हा उध्वस्त झालेला देश असून त्याच्या नादी लागून काहीही साध्य होणार नाही. आम्ही भारतीय होतो आणि भारतीयच राहू, असेही मट्टू यांनी म्हटले आहे.
किश्तवाडमध्ये सक्रिय दहशतवादी मोहम्मद अमीन उर्फ जहांगीर सरोरी याच्या कुटुंबाने त्यांच्या घरी तिरंगा फडकावला. तत्पूर्वी रविवारी मुदस्सीरच्या कुटुंबीयांनीही त्यांच्या घरी तिरंगा फडकावला होता. मुदस्सीर 22 एप्रिल 2018 पासून हिजबुल दहशतवादी संघटनेत सक्रिय आहे.
सरोरी कुटुंबाने तिरंगा फडकावून आपल्या मुलाला पुन्हा मुख्य प्रवाहात येण्याचे आणि दहशतीचा मार्ग सोडण्याचे आवाहन केले. सरोरीचा मुलगा आदिल म्हणाला की त्याला त्याच्या वडिलांची खूप आठवण येते आणि त्यांनी घरी परतण्याचे आवाहन केले. आदिलने सांगितले की, तो सध्या बारावीत शिकत आहे. त्याला भविष्यात डॉक्टर व्हायचे आहे. सरोरी यांच्या कुटुंबीयांनी राज्यातील सर्व जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.