
पर्यावरणीय परिसंस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हत्तींच्या सध्या जगभरात तीनच प्रजाती अस्तित्वात आहेत. तेव्हा नुकत्याच संपन्न झालेल्या जागतिक हत्ती दिनानिमित्त गजराजाचे महत्त्व विशद करणारा हा लेख...
2017 मध्ये झालेल्या हत्तींच्या गणनेनुसार, भारतात सुमारे 29 हजार, 964 हत्ती आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, जगातल्या 60 टक्क्यांहून अधिक जंगली एशियाटिक हत्ती भारतात आहेत. 6 हजार, 399 हत्तींच्या संख्येसह कर्नाटक हे सर्वात जास्त हत्ती असलेले राज्य आहे. दरवर्षी दि. 12 ऑगस्ट रोजी जागतिक हत्ती दिवस साजरा केला जातो. जागतिक स्तरावर हत्तींच्या संवर्धनाबाबत जनजागृती वाढवण्यासाठी हा दिवस समर्पित आहे. हा दिवस हत्तीचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी एक मंच प्रदान करतो आणि या कार्यात येणार्या अडचणींकडे लक्ष वेधतो, तर या ‘जेंटल जायंट्स’ बद्दल तुम्हाला किती माहिती आहे? चला आज हत्तीचे काही कमी ठाऊक असलेले पैलू पाहूया. तुम्हाला ठाऊक आहे का, सगळ्या प्राणी जगतातला सर्वात कमालीचा अवयव म्हणजे हत्तीची सोंड. हत्तीच्या सोंडेचे वजन सुमारे 400 पौंड असते, पण त्यात सुमारे एक लाख विविध स्नायूदेखील आढळतात. त्यामुळे, इतकी वजनदार वस्तू असतानादेखील, हत्तीची सोंड खूप चपळ तर असतेच पण ती अगदी गवताचे एक पाते उचलू शकेल इतकी लवचिकदेखील असते. आता माणसात कसे, आपण काही लेफ्टी असतो, तर काही राईटी, आसतो, हत्तीदेखील असे वैशिष्ट्ये आढळते. आहे की नाही गंमत?
तसंच, सहसा आपण हत्तीला प्रचंड, भीतीदायक प्राणी म्हणून पाहतो. त्यांच्या प्रचंड आकारामुळे नैसर्गिकरित्या हत्तीची भीती वाटते. हत्तीची जाड त्वचा चिलखताप्रमाणे काम करते आणि कोणत्याही धोक्यापासून त्यांचे रक्षण करते आणि त्यांच्या सुळ्यांना तर इतर प्राणीदेखील घाबरतात. पण तुम्हाला ठाऊक आहे का? त्या जाड त्वचेखाली आणि विशाल शरीराच्या आत, हत्ती हा फार कोमल हृदयाचा संवेदनशील प्राणी आहे. हत्तीला भावना असतात आणि त्यांच्या भावना अत्यंत नाजूक असतात. हत्तींना ‘जेंटल जायट्स’ म्हणूनच म्हणतात. कारण, हत्ती हा अशा काही मोजक्या प्राण्यांपैकी एक आहे जो भावना, सहानुभूती आणि भावनिक बुद्धिमत्ता प्रदर्शित करण्यास सक्षम असतो. माणसांप्रमाणेच हत्तीही सहानुभूती दाखवू शकतो. आता, सहानुभूती म्हणजे काय? तर, तो इतरांच्या भावना जाणून घेतो, समोरच्याला काय वाटत असेल ते समजून घेतो.
हत्ती, इतर हत्तींच्या वेदना आणि दुःख ओळखण्यासाठी आणि प्रतिसाद देण्यासाठी ओळखले जातात. जेव्हा कळपातील एखादा सदस्य जखमी होतो आणि इतर कळपाप्रमाणे वेगाने चालू शकत नाही, तेव्हा जखमी हत्ती मागे राहणार नाही याची दक्षता घेण्यासाठी कळपाची गती कमी केली जाते. हत्ती संशोधनांमध्ये हेदेखील नोंदवले आहे की, प्रसंगी हत्ती आपल्या आजारी प्रियजनांना मदत करण्याचा प्रयत्न करतात. संकट काळी, कळपाला हाक मारताना, हत्ती प्रियजनांना सोंडेने आणि सुळ्यांनी उचलतानादेखील आपण पाहतो. इतर हत्ती काय अनुभवत आहेत हे हत्तींना समजू शकते हे या वर्तनावरून दिसून येते.
पुढचा मुद्दा म्हणजे भीती. जेव्हा आपण माणसे घाबरतो तेव्हा आपण स्पर्शाने एकमेकांचे सांत्वन करतो. हत्ती आपल्याप्रमाणेच एकमेकांना मिठी मारतात आणि आधार देतात. हत्तीची वागणूक वेगळी नाही. प्राणी साम्राज्यातील सर्वात मोठा प्राणी असूनही, हत्तीदेखील घाबरतो आणि व्यथित होतो. जेव्हा हत्ती अस्वस्थ होतो, तेव्हा त्यांचे कान फडफडवीतो आणि एका कमी-फ्रिक्वेंसीचा आवाज काढतो. आता आपल्याला हा आवाज ऐकूदेखील येत नाही. पण हत्तीचा कळप हा आवाज ऐकतो आणि व्यथित हत्तीच्या सोंडेला स्पर्श करून त्यांचे सांत्वन करतो, असे संशोधन सांगते. या अविश्वसनीय वर्तनाचा अर्थ असा आहे की, हत्तीसुद्धा माणसाप्रमाणेच भावना ओळखू शकतो.
अजून एक नवल सांगू? हत्ती त्याच्या मृत बांधवांचा शोक करतो. हत्तींनी इतर हत्तींच्या मृत्यूबद्दल अनाकलनीय प्रतिक्रिया दाखवल्याचे संशोधनातून कळते. सहसा, या प्रतिक्रिया आपण मानव दाखवतो. जेव्हा हत्तींना मृत हत्तीचे शव किंवा अवशेष सापडतात, तेव्हा ते थांबतात आणि काही काळ शांत उभे राहतात. अवशेषांवर माती टाकतात, हाडे असतील तर वास घेतात आणि त्यांना स्पर्श करतात. हे वर्तन म्हणजे हत्तीची दुःख व्यक्त करण्याची पद्धत आहे आणि प्रगत भावनिक बुद्धिमत्तेचे लक्षण आहे. मृत्यूनंतरही अनेक वर्षांपर्यंत प्रियजनांची आठवण हत्ती ठेवतात याचेदेखील पुरावे संशोधनातून आपल्याला मिळाले आहेत.
आता हत्तीच्या बुद्धिमत्तेबद्दल तर तुम्ही ऐकलेच असेल. हत्तींचा मेंदू अत्यंत विकसित असतो. हत्ती आयुष्यात कधीच काहीही विसरत नाही. कदाचित त्यामुळेच, आपल्या आवडत्या देवाचे अर्थात गणपतीचे डोके हत्तीचे असते, इतर कोणत्याही प्राण्याचे नाही.
तुम्हाला या ‘जेंटल जायंट्स’बद्दल काय वाटते? आता हत्तींना काय वाटते आणि ते कसे वागतात याबद्दल अजून बरेच काही आपल्याला कळायचे बाकी आहे. हत्ती हा केवळ प्राणी नाही, तर सुख-दुःख, आनंद, सहानुभूती, राग अशा अनेक भावना व्यक्त करू शकणारा संवेदनशील जीव आहे आणि म्हणून त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. हत्तीच्या भावनिक क्षमतेची खोली आपल्याला अजून तरी नक्कीच कळलेली नाही, इतके नक्कीच.