“...आणि मुलीला खांद्यावर बसवून पहिल्यांदा सिंहगड दाखवला”, चिन्मय रमला आठवणीत

14 Aug 2023 21:30:34
 
chinmay mandalekar
 
 
 मुंबई : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होमार असून या निमित्ताने काही दिवसांपूर्वी ‘सुभेदार’च्या संपुर्ण टीमने सिंहगडावर जात तानाजी मालूसरेंच्या समाधीचे दर्शन घेतले होते. यावेळी अभिनेता चिन्मय मांडलेकरने सिंहगडावरची त्याची आठवण सांगत,"माझ्या जीवनातील मी पाहिलेला पहिला गड म्हणजे सिंहगड होता असे सांगत पहिल्यांदा सिंहगड मुलीला दाखवताना तिला खांद्यावर बसवून फिरवले होते", अशी आठवण चिन्मयने ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना सांगितली.
 
चिन्मय म्हणाला, “पहिल्यांदा माझ्या मुलीला मी सिंहगडावर घेऊन आलो होतो आणि खांद्यावर बसून मी तिला संपुर्ण किल्ला दाखवला होता. आणि तानाजी मालूसरेंच्या समाधी जवळ बसून तिला राजा शिवछत्रपती पुस्तकातील तानाजींवर आधारित धडा वाचून दाखवला होता. ही माझी सिंहगडावरची सगळ्यात महत्वाची आठवण आहे”.
 
त्यानंतर चिन्मय त्याच्या बालपणात रमला आणि म्हणाला, “ मी माझ्या आयुष्यात सगळ्यात पहिला जो गड पाहिला तो सिंहगड होता. मला आठवतं माझ्या लहानपणी मला माझे वडिल सिंहगडावर घेऊन आले होते. तेव्हाची खास आठवण अशी की मी एक टोपी घातली होती. आणि जेव्हा आम्ही गड चढून वर आलो तेव्हा वाऱ्याने ती टोपी उडून गेली. त्याक्षणी लक्षात आले की आपण किती उंचीवर उभे आहोत”, अशी लहानपणीची सिंहगडाची आठवण चिन्मयने सांगितली.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0