स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी ते शतक : काळ समृद्ध तरुण भारताचा

14 Aug 2023 20:48:16
Maharashtra Cabinet Minister Mangal Prabhat Lodha On Skill Development

कौशल्य आणि रोजगार म्हणजे देशाच्या आर्थिक वाढीची आणि सामाजिक विकासाची प्रेरक शक्ती आहे. या विकासासाठी समोर येणार्‍या प्रत्येक अडथळ्यावर मात करून, वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्थेत मुबलक प्रमाणात उच्च प्रशिक्षित गुणवत्ता कुशल संसाधनांची निर्मिती करणे, हेच सरकारचे ध्येय. शैक्षणिक पात्रतांसह, बदलत्या काळाचा सामना करण्यासाठी आणि कठीण तंत्रज्ञानाच्या आव्हानांना तोंड देण्यास सक्षम असलेले गतिशील आणि उद्योजक तरुण आपल्या समाजात वेगाने निर्माण होतील. नवीन पिढीचा कौशल्य विकास ही राष्ट्रीय गरज असून, ‘आत्मनिर्भर भारता’चा हा पाया आहे. कारण, ही पिढी स्वतंत्र भारताची वाटचाल ७५ वर्षांकडून १०० वर्षांपर्यंत घेऊन जाईल.
 
आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली. याप्रसंगी सर्व देशवासीयांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा! आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेत आहोत, त्यामागे भारतमातेच्या लाखो लेकरांचा त्याग, बलिदान आणि देशासाठी निष्ठा आहे. आज त्या भारतमातेच्या पुत्रांना, स्वातंत्र्यसैनिकांना, स्वातंत्र्यवीरांना वंदन करतो. १९४७ साली स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात नव्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय स्वप्नांची सुरुवात झाली. काळ इतका वेगाने पालटला की, इंग्रजांनी शोषण करून अतिशय गरीब परिस्थितीत सोडलेला भारत आज जगातील तिसरी बलाढ्य अर्थव्यवस्थ्या बनण्याच्या उंबरठ्यावर आहे. तीन दशकांपूर्वी अर्ध्यापेक्षा जास्त दारिद्य्ररेषेखाली असलेल्या जनतेचे प्रमाण आज २० टक्क्यांपेक्षा कमी आहे. आज भारताकडे भरपूर क्रियाशक्ती असलेल्या तरुणांचा देश म्हणून बघितले जाते. हेच तरुण म्हणजे आपल्या ‘आत्मनिर्भर भारता’चा पाया आणि भविष्यात भारताच्या आर्थिक विकासात अमूल्य योगदान देणारी पिढी आहेत. स्वतंत्र भारताची वाटचाल ७५व्या वर्षांकडून शतक महोत्सवी १००व्या वर्षांपर्यंत घेऊन जाणारी हीच युवा पिढी आहे. आज आपल्या या युवाशक्तीला रोजगारविषयक कौशल्य आणि ज्ञान देऊन भारताच्या समृद्ध आर्थिक भविष्यासाठी सुसज्ज करणे आवश्यक आहे.

घरातील लॅण्डलाईन ते खिशातला स्मार्टफोन या बदलाच्या वेगानेच कौशल्य व रोजगार क्षेत्रातसुद्धा आमूलाग्र बदल होत आहेत. आजवर देशाच्या आर्थिक विकासातील महानायक हा रोजगार असल्याचे पदोपदी सिद्ध झाले. त्यामुळे नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी रोजगाराचे अनन्य साधारण महत्त्व असेल आणि त्यादृष्टीने केंद्र आणि राज्य सरकार योग्य पद्धतीने निर्णय घेत आहे.

रोजगार हाच आर्थिक विकासातील महानायक

आज जगाच्या पाठीवर कुशल मनुष्यबळाचा एक सक्षम स्रोत म्हणून भारताची ओळख वाढत आहे. आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने प्रवास करत असताना जगाच्या बदलत्या गरजांसाठी आणि आपल्या विकासासाठी कुशल मनुष्यबळाची निर्मिती भारतात होत आहे. देशाच्या या प्रवासात ‘पंतप्रधान कौशल्य विकास योजना’ यासारख्या उपक्रमांमुळे आपले युवक सक्षम आणि कुशल बनत आहेतच. परंतु, ’पंतप्रधान रोजगार मेळावा’ यासारख्या उपक्रमाच्या माध्यमातून युवकांना रोजगार मिळत आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्तरावर नऊ लाख सरकारी नोकर्‍या युवकांना उपलब्ध झाल्या आहेत. आपल्या महाराष्ट्रातसुद्धा कुशल मनुष्यबळ विकासाच्या अनुषंगाने अतिशय विचारपूर्वक विविध उपक्रमांची सुरुवात करण्यात आली आणि त्याचबरोबर रोजगाराच्या दिशेनेसुद्धा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्यात ७०० पेक्षा अधिक रोजगार मेळावे आयोजित केले गेले आणि यातून ८८ हजार, १०८ नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला. तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी राज्यातील आस्थापनांच्या सहकार्याने ’इंडस्ट्री मीट’ या उपक्रमाच्या माध्यमातून सामंजस्य करार करण्यात आले.

दि. १६ नोव्हेंबर २०२२ रोजी १ लाख, २१ हजार युवक-युवतींना उद्योग, कॉर्पोरेट संस्थांमध्ये रोजगार देण्यासाठी राज्यातील ४४ नामांकित उद्योजक, कॉर्पोरेट संस्था, औद्योगिक संघटना, प्लेसमेंट एजन्सिज यांच्यासमवेत सामंजस्य करार करण्यात आला. या कराराद्वारे राज्यातील बेरोजगार युवक, युवतींसाठी आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी), मीडिया अ‍ॅण्ड एन्टरटेनमेंट, बांधकाम, रिटेल, बँकिंग, एव्हीएशन इत्यादी विविध क्षेत्रामध्ये दहावी पास, नापास, बारावी, पदवीधर, पदविकाधारक, फार्मसी, आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग पदवी इत्यादी पात्रताधारक उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आणि ७८ हजार युवक युवतींना रोजगार मिळाला. त्याचप्रमाणे पुणे येथे झालेल्या ‘इंडस्ट्री मीट’मध्ये कंपन्यांसह २ लाख, ७ हजार जागांसाठी सामंजस्य करार करण्यात आले. तसेच, ठाणे येथे झालेल्या ‘इंडस्ट्री मीट’मध्ये कंपन्यांसह २ लाख, ५७ हजार जागांसाठी सामंजस्य करार करण्यात आले.
 
नोकरी सोबतच स्वयंरोजगारासाठी सुद्धा प्रशासनातर्फे मदत करण्यात येत आहे. मोजकेच शिक्षण, घरची बेताची परिस्थिती, नोकरीचा अभाव अशा परिस्थितीत असतानासुद्धा काही लोकांनी स्वतःचे कौशल्य ओळखून व्यवसाय सुरू करण्यासाठी अण्णासाहेब पाटील ‘आर्थिक मागास विकास महामंडळा’च्या ’आर्थिक सहकार्य योजने’चा लाभ घेतला. महाराष्ट्रातील ‘स्टार्टअप्स’ना कायदेशीर, आर्थिक, आयपी, क्लाऊड आणि ’मेंटॉरशिप’सह मूल्यवर्धित सेवा प्रदान करण्यासाठी ९१ ’स्प्रिंगबोर्ड बिझनेस हब’च्या सहकार्याने ‘व्हर्च्युअल इन्क्युबेशन सेंटर’ उभारण्याचे प्रस्तावित आहे.

कौशल्य संपन्न महाराष्ट्र

कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत ‘छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबीर’ आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या करिअरविषयक विविध संधींची माहिती, या शिबिरांमधून देणे आणि विद्यार्थी, युवक-युवतींसह पालकांचेही करिअर विषयक विविध संधींसंदर्भात समुपदेशन करणे, या उद्देशाने राज्यातील सर्व २८८ मतदारसंघापैकी २६० ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा महाराष्ट्रातील १ लाख, ७४ हजार, ६३८ विद्यार्थांना लाभ झाला. तसेच, १५ हजार, ४९३ पालकांनीसुद्धा सहभाग घेतला. राज्यातील विद्यार्थी, युवक-युवती आणि पालकांना करिअरविषयक विविध संधींची माहिती घर बसल्या घेता यावी, यासाठी कौशल्य विकास विभागाचे ई-मेल आणि फोन नंबर कार्यरत असून, संपूर्ण राज्याकरिता कायमस्वरूपी हेल्पलाईन क्रमांक लवकरच सुरू होणार आहे.

कौशल्य विकासासाठी आज महाराष्ट्रात ४५७ ’आयटीआय’ संस्था असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी शासन तत्परतेने कार्यरत आहे. या संस्थांना ‘ट्रेनिंग सेंटर्स’चा दर्जा मिळाला असून, येथे कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम पुरवण्यात येतात. या संस्थांमध्ये मिळणार्‍या प्रशिक्षणाचा दर्जा टिकून राहावा, यासाठी येथील प्रशिक्षकांनासुद्धा ’एलटी कंपनी’च्या माध्यमातून अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जात आहेत. येथे अगदी बांबू शिल्प प्रशिक्षण, संगीत वादनाचे शिक्षण इथपासून ड्रोन टेक्नोलॉजीसारखे आधुनिक तंत्रज्ञान शिकवणारे उपक्रम उपलब्ध होणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञान शिक्षणाची विशेष उपलब्धी म्हणजे औंध आणि नाशिक येथील ’आयटीआय’मध्ये (अशीेपर्रीींळलरश्र र्डीीींर्लीीींश र्र्एिींळिाशपीं ऋळीींंशी) हा उपक्रम सुरू झालेला आहे. परदेशातील रोजगाराच्या संधी लक्षात घेता, आपल्या तरुणांना जर्मन, फ्रेंच, जपानी यांसारख्या भाषादेखील शिकवण्यात येणार आहेत. या ’आयटीआय संस्थां’मध्ये व्हर्च्युअल क्लासरूम सुरु करणे, ओपन जिम, स्मार्ट लायब्ररी इत्यादी सुविधासुद्धा लवकरच उपलब्ध होतील.
 
सुशिक्षित तरुणांच्या रोजगार/ स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचे महत्त्व ओळखून गरीब कुटुंबातील युवक-युवतींना त्यांच्या निवासाजवळच कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने (डज्ञळश्रश्र ेप थहशशश्र) ही योजना आखण्यात आली. याअंतर्गत जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण कार्यालयास सात बसेसमध्ये स्किल सेंटर विकसित करून प्रशिक्षण देण्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्य बळाची गरज ओळखून, महाराष्ट्रात दहा उत्कृष्टता केंद्रे स्थापन होणार आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात केंद्रित कौशल्य विकासासाठी ५०० ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास उपक्रम राबवण्यात येणार आहे, जेणेकरून ग्रामीण भागातून शहरी भागाकडे रोजगारासाठी होणारे स्थलांतरण थांबेल. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने महाराष्ट्रात ‘लॉजिस्टिक पार्क’ धोरण आणून ’लॉजिस्टिक’ हब बनवणे तसेच वस्त्रउद्योग, खनिकर्म क्षेत्रासाठी नवीन धोरण आणणे, ‘स्टार्टअप्स’साठी निवासी प्रशिक्षण, संशोधन संस्थेची स्थापना, ’जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी पार्क’ महत्त्वाच्या शहरांमध्ये सहा ’सर्क्युलर इकोनॉमी पार्क’सुद्धा स्थापन करण्याची योजना आहे.

कौशल्य आणि रोजगार म्हणजे देशाच्या आर्थिक वाढीची आणि सामाजिक विकासाची प्रेरक शक्ती आहे. या विकासासाठी समोर येणार्‍या प्रत्येक अडथळ्यावर मात करून, वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्थेत मुबलक प्रमाणात उच्च प्रशिक्षित गुणवत्ता कुशल संसाधनांची निर्मिती करणे, हेच सरकारचे ध्येय. शैक्षणिक पात्रतांसह, बदलत्या काळाचा सामना करण्यासाठी आणि कठीण तंत्रज्ञानाच्या आव्हानांना तोंड देण्यास सक्षम असलेले गतिशील आणि उद्योजक तरुण आपल्या समाजात वेगाने निर्माण होतील. नवीन पिढीचा कौशल्य विकास ही राष्ट्रीय गरज असून, ‘आत्मनिर्भर भारता’चा हा पाया आहे. कारण, ही पिढी स्वतंत्र भारताची वाटचाल ७५ वर्षांकडून १०० वर्षांपर्यंत घेऊन जाईल.

कौशल्य विकास आणि रोजगाराची सांगड घालून आपल्या समाजातील प्रत्येक घटकाचा विकास सध्या करूया. देशासाठी बलिदान देणार्‍या हुतात्म्यांच्या स्वप्नातला भारत सर्वांच्या साथीने निर्माण करूया.
 
सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा!
स्वतंत्र भारत चिरायू होवो!

मंगलप्रभात लोढा
(लेखक राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री आहेत.)


Powered By Sangraha 9.0