नवी दिल्ली : वनवासी बांधवांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी केंद्र सरकारद्वारे अनेक विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामुळे वनवासी बांधवांनीदेखील आपल्या परंपरा जपून आधुनिकतेचा अंगिकार करावा, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले आहे.
भारताच्या ७६ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येस परंपरेप्रमाणे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रास संबोधित केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, वनवासी समुदायाने युगानुयुगे आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. त्याविषयी संपूर्ण देशाची सहानुभूती त्यांच्यासोबत आहे. जनजाती समुदायातील लोक निर्सगास माता मानतात आणि त्या मातेच्या संतानांची म्हणजेच प्राणी, वनस्पती आणि सर्व जीवजंतूंप्रती स्नेह बाळगतात. वनवासी बंधु आणि भगिनींची स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांनाही प्रगतीच्या यात्रेस सामील करून घेण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामुळे वनवासी समुदायाने आपल्या परंपरांना कायम ठेवून आणि त्यांना अधिक समृद्ध करतानाच आधुनिकतेचाही अंगिकार करावा, असे आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केले.
देशाच्या विकासामध्ये महिला मोठे योगदान देत असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, आज आपल्या महिलांनी अशा अनेक क्षेत्रात विशेष स्थान निर्माण केले आहे ज्यात त्यांच्या सहभागाची काही दशकांपूर्वी कल्पनाही केली जात नव्हती. आपल्या देशात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर विशेष लक्ष दिले जात आहे हे पाहून मला आनंद होत आहे. आर्थिक सक्षमीकरणामुळे महिलांचे कुटुंब आणि समाजातील स्थान मजबूत होते. मी सर्व देशवासियांना महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याचे आवाहन करतो. आमच्या बहिणी आणि मुलींनी सर्व प्रकारच्या आव्हानांना धैर्याने सामोरे जावे आणि जीवनात पुढे जावे, असेही राष्ट्रपतींनी नमूद केले.
संपूर्ण जगात विकासाची उद्दिष्टे आणि मानवतावादी सहकार्याला चालना देण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. जी २० च्या अध्यक्षपदाद्वारे जगाच्या लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करत असल्याने भारतासाठी जागतिक प्राधान्यक्रमांना योग्य दिशेने नेण्याची ही एक अनोखी संधी आहे. देशाने आव्हानांना संधींमध्ये रूपांतरित केले आहे आणि जीडीपीमध्ये प्रभावी वाढ नोंदवली आहे. भारताची अर्थव्यवस्था केवळ कठीण काळातच सक्षम नाही तर इतरांसाठीही आशेचा स्रोत बनली आहे. वंचितांना प्राधान्य देणे हे आमच्या धोरणांचे आणि कृतींचे केंद्रस्थान आहे. परिणामी, गेल्या दशकात मोठ्या संख्येने लोकांना गरिबीतून बाहेर काढणे शक्य झाले आहे, असेही राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
‘चांद्रयान’ ही तर केवळ सुरूवात !
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) नवी उंची गाठत असून उत्कृष्टतेचे नवे मापदंड प्रस्थापित करत आहे. इस्रो ने ‘चांद्रयान ३’ चे प्रक्षेपण केले असून त्याने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. ‘चांद्रयान’ हे भारतीय अंतराळ कार्यक्रमांसाठी केवळ एक सुरूवात असून भारतास आणखी बरेच पुढे जायचे आहे, असेही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.