‘ताप’ लागला फुला...

14 Aug 2023 21:34:39
Climate change on earth impact the diversity of orchids

हवामान आणि वातावरणीय बदलांचा पृथ्वीवरील जैवविविधतेवर नकारात्मक परिणाम होत असल्याचे कित्येक संशोधनातून सिद्ध झाले आहेच. प्राणी, पक्षी तसेच फुलांवरही हवामान बदलाचे असे विपरीत परिणाम दिसून येतात. मग रंगीबेरंगी आणि लक्षवेधी ऑर्किड्सलाही त्याला अपवाद नाहीच.
 
जैवविविधतेतील मोठ्या कुटुंबांपैकी एक असलेलं ऑर्किड हे कुटुंब. जगभरात या ऑर्किड्सच्या तब्बल २८ हजार प्रजाती आढळतात. त्यापैकी भारतात ऑर्किडच्या १ हजार, २०० प्रजाती आहेत. हिमालयात सर्वाधिक, तर देशातील ईशान्येकडील राज्यांमध्ये, पश्चिम घाट, दख्खनचे पठार आणि अंदमान-निकोबार बेटांमध्ये ऑर्किड्स आढळतात. ऑर्किड या अत्यंत प्रगत वनस्पती म्हणून ओळखल्या जातात. या वनस्पती परागकणांना आकर्षित करण्यासाठी विविध क्लृप्ती विकसित करतात, असंही सांगितलं जातं. ऑर्किड हे परिसंस्थेच्या आरोग्याचे सूचक आहेत आणि त्यांची उपस्थिती ही परिसंस्था चैतन्यशील असल्याचे दर्शक मानले जाते. तसेच ऑर्किड्सचे अनेक औषधी उपयोगही आहेत.

भारतातील आसामच्या जंगलांमध्ये असणारी स्थानिक ऑर्किडची प्रजाती म्हणजे ‘फॉक्सटेल ऑर्किड.’ नैसर्गिकरित्या आसामच्या जंगलांमध्ये वाढणार्‍या या प्रजातीचे आणि स्थानिकांचे तर अगदी जिव्हाळ्याचे संबंध. एकट्या आसाममध्ये ऑर्किड्सच्या ४११ प्रजातींची नोंद करण्यात आलेली आहे. हे ऑर्किड्स दरवर्षी साधारण एप्रिलसच्या सुमारास बहरतात आणि याच दरम्यान आसामी नागरिकही ‘बिहू’ हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. परंतु, एप्रिलमध्ये फुलणारे हे ऑर्किड्स यंदा मात्र मार्चमध्येच फुलायला सुरुवात झाली. वरवर पाहता ही आनंदाची बातमी वाटत असली तरी जैवविविधतेच्या चक्रानुसार ती फारशी सुखावणारी नाही आणि म्हणूनच तज्ज्ञांनी याविषयी चिंता व्यक्त केली आहे.

‘आसाम स्टेट अ‍ॅक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज’ने गेल्या ६० वर्षांत आसामचे तापमान ०.५९ डिग्री सेल्सियसने वाढल्याचे स्पष्ट केले, तर पावसाचे प्रमाण हे २.९६ मिलीमीटरने कमी झाल्याचे नोंदवले आहे. याचाच अर्थ यातून तापमान आणि हवामान बदल किती प्रमाणात झाला, हे स्पष्ट होते. प्रदूषणात्मक किंवा निरोगी नसलेल्या हवेत सहसा ऑर्किड तग धरू शकत नाहीत आणि म्हणूनच ते परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी असल्याचे प्रतीक मानले जातात.

अनेक औषधी उपयोग तसेच शृंगारामध्ये किंवा सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्‍या ऑर्किड्सचे बाजारी मूल्यदेखील अधिक आहे आणि म्हणूनच, ऑर्किड्सची बर्‍याच मोठ्या प्रमाणात तस्करीही केली जाते. ‘सीआयटीईएस’मध्ये येणार्‍या यातील काही प्रजातींची तस्करी केल्यास वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत शिक्षेची देखील तरतूद आहे. अशा या ऑर्किडचे ढोबळमानाने तीन भागांमध्ये वर्गीकरण केले जाते. जमिनीवर वाढणारे, झाडांच्या बुंध्यावर वाढणारे आणि बुरशीसदृश जीवांवर वाढणारे ऑर्किड्स. या प्रकारांपैकी झाडांच्या बुंध्यावर असलेल्या ऑर्किड्सला मात्र सर्वाधिक धोका असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

कारण, झाडांच्या बुंध्यावर वाढणार्‍या प्रजातींना परागीभवन करण्यात अडचण निर्माण होते. तुलनेने जमिनीवर वाढणार्‍या प्रजातींचे परागीभवन लवकर आणि सुकर होते. परागीभवनात अडथळा निर्माण झाला, तर त्याचे बीजोत्पादन कमी होईल आणि परिणामी ऑर्किड्सची संख्या दिवसेंदिवस कमी होईल तसेच ते नामशेष होण्याच्या मार्गावरही जाऊ शकतात. अधिक चिंतेची बाब अशी की भारतात झाडांच्या बुंध्यावर वाढणार्‍या ऑर्किड्सची संख्या ही ६० टक्क्यांपर्यंत आहे.
 
याचाच अर्थ या ऑर्किड्सना याचा सर्वांत मोठा धक्का पोहोचण्याची शक्यता असून तापमानवाढीच्या या तापाने या फुलांच्या बहरण्यावरही परिणाम झालेला जाणवतो. जैवविविधतेतील प्रत्येक घटकाला आपले असे महत्त्व असून त्याचे महत्त्व आणि परिसंस्थेतील भूमिका अबाधित ठेवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत हे सर्व आटोक्यात आणण्याची नितांत गरज आहे. वातावरण आणि हवामान बदलाला कारणीभूत ठरणार्‍या गोष्टी आटोक्यात आणल्या नाहीत तर, या विपुल जैवविविधतेला आपल्याला मुकावे लागेल, यात शंका नाही.

Powered By Sangraha 9.0