पुणे : देशभरात 'हर घर तिरंगा' (घरोघरी तिरंगा) उपक्रम राबवण्यात येत असून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही कोथरुडमधील आपल्या निवासस्थानी राष्ट्रध्वज उभारुन या उपक्रमाची सुरुवात केली आहे. तसेच त्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदनादेखील दिली आहे.
प्रत्येक भारतीयांसाठी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. हजारो स्वातंत्र्य योद्ध्यांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. त्यामुळे या अमृतमहोत्सवी वर्षात सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण केले जात आहे. त्यासाठी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. यात प्रत्येकांने सहभागी होऊन हा उत्सव उत्साहाने साजरा करावा. तसेच राष्ट्रध्वज फडकवताना त्याचा सन्मान राखला जाईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
'माझी माती माझा देश' या उपक्रमाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची सांगता होत आहे. तसेच मागील वर्षाप्रमाणे यावर्षीसुध्दा 'घरोघरी तिरंगा' उपक्रम राबविण्यात येत आहे. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
यानिमित्ताने केंद्र सरकारच्यावतीने प्रत्येक देशवासीयांनी आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन आपला देशाभिमान व्यक्त करण्यासाठी स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यातच आता पालकमंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या कोथरुडमधील निवासस्थानी राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना दिली.