लोककलेच्या वारशासाठी...

14 Aug 2023 21:06:13
Article On Folk Artist Dr. Ganesh Chandanshive

 लोककलेचे गाढे अभ्यासक आणि कलाकार डॉ. गणेश चंदनशिवे हे मुंबई विद्यापीठाच्या ‘लोककला अकादमी’चे प्रमुख आहेत. त्यांच्या कलाजीवनाचा घेतलेला मागोवा...

’‘आई, आजपासून तू दुसर्‍याच्या शेतात राबायला जायचं नाहीस.” काही दशकांपूर्वीची गोष्ट... शेतमजुरी करून हातावर फोड आलेल्या आईला पाहून गणेश चंदनशिवे अश्रू भरल्या डोळ्यांनी आईला म्हणाले होते. भाकरीचा आणि जगण्याचा प्रश्न मोठाच होता. त्यामुळे शिकता शिकताच गणेश काम करू लागले. जनावरांना चारा घालणे, शेणसारवण करणे, शेताला पाटाने पाणी देणे, रुग्णालयात बदली सफाई कामगार म्हणून करताना-संडास सफाई, झाडलोट करणं, ड्रीप बेड साफ करणे, बाळंत झालेल्या स्त्रियांच्या नाळेची व्यवस्थित विल्हेवाट लावणे, पोस्ट मॉर्टमला मदत करणे, मजुरी करणे असू दे की, तमाशाच्या फडात काम करणे असू दे, ही सगळी काम गणेश यांनी केली. भाकरी मिळवण्यासाठी, शिकण्यासाठी आणि जगण्यासाठीही आयुष्याच्या वाटेवर काटेच बोचताना गणेश यांच्या मनात मात्र लोककलेचे गारूड पिंगा घालत असे. त्यांच्या गळ्यातला सूर आणि कलानिष्ठतेचा व्यासंग मात्र क्षणाक्षणाला श्रीमंत होत होती. अटळ वेदनेच्या गर्भातून कलेचा वारसा जोपासणार्‍या या मुलाने प्रचंड कष्टातून प्रामाणिकतेतून कलाविश्वात पुढे डॉ. गणेश चंदनशिवे म्हणून स्वतःचा ठसा उमटवला.

आज डॉ. गणेश चंदनशिवे मुंबई विद्यापीठाच्या ’लोककला अकादमी’चे विभागप्रमुख आहेत. शिवाय, विविध विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावरही आहेत. लोककलेच्या विश्वातील विविध प्रयोग करणार्‍या आणि रमणार्‍या डॉ. गणेश यांचा लोककलेचा व्यासंग आणि अभ्यास दांडगाच. ’लोक रंगभूमीवरील तमाशा सादरीकरणाचं बदलतं स्वरूप: एक चिकित्सक अभ्यास’ या विषयावर त्यांनी ’पीएचडी’ मिळवली.

त्यानंतर याच परिक्षेपात त्यांनी अगदी जागतिक स्तरावर शोधनिबंध लिहिले. त्यापैकी काही महत्त्वाचे शोधनिबंध म्हणजे ‘स्वातंत्र्यपूर्व तमाशा रंगभूमी वाटचाल : एक चिकित्सक अभ्यास’, ‘तमाशा वगनाट्य’, ‘संत साहित्यात महिलांचे योगदान’, ’लोककलेचे अंतरंग’, ‘लोककलेत महिलांचे योगदान’, ’भारतीय लोकनाट्य’, ’मिथक एक अनुशीलन’, ’फंडामेंटल हूक आर्ट्स’, ‘तमाशा : एक रांगडा खेळ’ , ’आदिवासी समाजाचे वर्तमान’, ‘आदिवासी जनजाती शिक्षणाचे महत्त्व’ इत्यादी विषयांवर त्यांनी शोधनिबंध सादर केले. ‘शैतान’, ’बाजीराव मस्तानी’, ’तानाजी ते बाळकडू’, ’शौर्य’, ‘मस्का’, ’बया’, ’रुद्र’ अशा विविध चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलेले आणि झाकीर हुसेन आणि शंकर महादेवन यांच्यासमवेत सुगम संगीत मैफलीचा सप्तम गाठणारे डॉ. गणेश तत्कालीन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत झालेल्या आठव्या आंतरराष्ट्रीय ’रंगमंच ऑलिम्पिक’मध्ये लाल किल्ल्यावर त्यांनी लोककला सादरीकरणही केले, तर ’दुसरीकडे विच्छा माझी पुरी करा’, ’गाढवाचे लग्न’ , ’तीन पैशाचा तमाशा’, ’जांभूळ आख्यान’ , ’खंडोबाचे लगीन’ , ’गोष्ट अकलेची’, ’पुढारी पाहिजे’, ’गावची जत्रा पुढारी सतरा,’ या मराठी लोकनाट्यात त्यांचा सहभाग राहिला आहे. डॉ. गणेश यांना अनेक राष्ट्रीय स्तरावरचे अनेक पुरस्कार प्राप्त आहेत.

डॉ. गणेश चंदनिशवे यांचे मूळ गाव बीड जिल्ह्यातील राजेगाव. वाडवडिलांची शंकर महार चंदनशिवे लोकनाट्य पार्टी होती. तमाशासाठी चंदनशिवे कुटुंब गाव सोडून जाफरबाद तालुक्यातल्या टेंभुर्णीला आले. गावाबाहेर कुठं तरी पालं टाकायचा, पावसाळा सोडून नऊ महिने भटकंती. तमाशा करायचा आणि पावसाचा पहिला शिडकावा पडला की, परत गावी जायचे. याच लोकनाट्य पार्टीत गणेश यांचे वडील संपतरावही काम करायचे. मात्र, पुढे शिक्षणासाठी म्हणण्यापेक्षा जगण्यासाठी संपतराव घराबाहेर पडले आणि ते शिकले. या सगळ्याला प्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची होती. पुढे संपतराव शिक्षक झाले. त्यांची सद्गुणी पत्नी मंदाबाई. या दोघांचे अपत्य गणेश. दुर्देवाने पुढे संपतराव व्यसनाधीन झाले.

गणेश इयत्ता दहावीत शिकत असतानाच संपतरावांचे निधन झाले. अठराविश्व दारिद्य्राचे नांगर घरावर फिरले. असाही दिवस उगवे की, गरिबीमुळे गणेश यांची भाकरी चुके. मात्र, रिकाम्या पोटीही त्यांचे गाणे सुटले नाही. त्यांना लहान वयातही जाणवे की, लोककलाच आपल्या जीवनाची खरी साथीदार आहे. त्यामुळे मोठेपणी काय होणार, यावर त्यांचे उत्तर असे - “शिपाई झालो तरी ठीक आहे. मात्र, गाणं सुटलं नाही पाहिजे.” पुढे कष्टातून शिक्षण घेत त्यांनी नाट्यशास्त्र पदवी त्यांनी प्राप्त केली. या सगळ्या काळता त्यांना चांगले गुरूजन लाभले. त्यांच्याही आयुष्यात अनेक समस्या आल्या; पण वेदनेला सारत एखादा सूर, ताल त्यांच्या मनात असा काही घुमे की, सगळे दुःख त्या कलेच्या आवर्तनात डुंबून जाई आणि तो स्वर विश्वाशी तादात्म्य पावत हुंकार घेई. त्यामुळेच गणेश यांच्या आयुष्यात नकारत्मकतेचा लवलेशही नाही.

तसेच, गरिबीची जाण असलेले डॉ. गणेश गोरगरीब विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करतात. त्यांनी घडवलेले कितीतरी विद्यार्थी आज कलाक्षेत्रात नाव लौकिक गाजवित आहेत. दुसरीकडे ते लोककलाकारांच्या समस्या दूर करण्यासाठी सातत्याने आवाज उठवत असतात, कार्य ते करत असतात. डॉ. गणेश म्हणतात की,”माझे आयुष्य कलेला वाहिलेले आहे. लोककलेच्या आणि लोककलाकारांच्या उत्कर्षासाठी मी आजन्म काम करत राहणार. त्यासाठीच माझे जगणे आहे.” कलेसोबतच समाजासाठीही अखंड कार्यरत असलेले डॉ. गणेश चंदनशिवे लोककलेच्या दालनातील दीपस्तंभच!

९५९४९६९६३८


Powered By Sangraha 9.0