विविध क्षेत्रातील दिग्गज तयार करणार विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम; 'एनसीईआरटी'चा महत्त्वपूर्ण निर्णय
13 Aug 2023 17:16:17
नवी दिल्ली : विविध क्षेत्रातील मान्यवर आता विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम तयार करणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) ने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून देशातील विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींची टीम तयार करण्यात येणार आहे. या १९ जणांच्या टीमद्वारे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे. एनसीईआरटीने १९ दिग्गज व्यक्तिमत्त्वांवर जबाबदारी सोपवली आहे.
दरम्यान, 'एनसीईआरटी'ने शालेय अभ्यासक्रम तयार करण्यासाठी प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष बिबेक देबरॉय यांच्यासह १९ प्रतिष्ठित व्यक्तींची समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष 'एनआयईपीए'चे महेश चंद्र पंत यांना या समितीचे अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे.
दरम्यान, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) ने एक अधिसूचना जारी केली आहे. एनसीईआरटीचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि अध्यापन साहित्य समिती (एनसीटीसी) नावाची स्वायत्त संस्था स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेअंतर्गत १९ सदस्यीय समिती स्थापन करण्यात येत आहे. ही समिती इयत्ता तिसरी ते १२ वीपर्यंतची पुस्तके आणि अध्यापन साहित्य अंतिम करणार आहे.
याशिवाय कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाच्या प्राध्यापक पद्मश्री सुजाता रामादोराई, प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीचे संचालक, बेंगळुरू, यू.के. विमल कुमार, आयआयटी गांधी नगरचे व्हिजिटिंग प्रोफेसर मायकल डॅनिनो आणि हरियाणा कॅडरचे निवृत्त आयएएस आणि हरियाणा इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनचे माजी महासंचालक आणि माजी मुख्य शिक्षण सचिव सुरीना राजन हे देखील एनसीईआरटीच्या या समितीचे सदस्य असतील.