वडीलधाऱ्या माणसाला भेटायला आल्यास त्यात गैर काय; अजितदादांच्या भेटीवर शरद पवारांचे विधान

13 Aug 2023 17:57:49
NCP President sharad Pawar On Ajit Pawar

मुंबई
: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या गुप्तभेटीसंदर्भात खुलासा करण्यात आला आहे. अजित पवार आपले पुतण्या असून आपण वडिलकीच्या नात्याने त्यांना भेटलो असल्याचे शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच, पवार कुटुंबातील आपण वडीलधारी व्यक्ती असून वडीलधाऱ्या माणसाला भेटायला आल्यास त्यात गैर काय असेही ते म्हणाले.

दरम्यान, भाजपसोबत जाण्याच्या प्रश्नावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी भाष्य केले असून ते म्हणाले, भाजपची विचारधारा आमच्या चौकटीत बसत नसल्याने भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही, तसेच आपल्या भूमिकेत कुठलाही बदल होणार नाही, असे पवार म्हणाले. तसेच, विरोधकांवर होणाऱ्या केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईवर ते म्हणाले, यंत्रणांचा गैरवापर होत असून राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये गेलेले नेते आता दुःखी असल्याचे पवारांनी यावेळी सांगितले.

भाजपविरोधी 'इंडिया' आघाडीच्या मुंबईत ग्रँड हयात हॉटेलमध्ये होणाऱ्या बैठकीत पुढील रणनीती ठरणार असल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले.




Powered By Sangraha 9.0